उत्तर प्रदेशमध्ये अमरोहा गावातल्या एका पोलिस चौकीच्या इनचार्जने लोकांसोमर एक नवा आदर्श घालून दिला आहे. इथल्या गजरोला पाोलिस ठाण्याचे प्रभारी नीरज कुमार यांनी या पोलिस ठाण्याचा आसपासचा परिसर साफ रहावा यासाठी स्वत: प्रयत्न करणं सुरू केलं आहे. इथला परिसर सुरक्षित राहावा यासाठीही ते प्रयत्न करत आहेत.

नीरज कुमार यांच्या या पोलिस ठाण्याच्या जवळ एक हायवे आहे. या हायवेवर भरपूर खड्डे असून त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. सर्व सरकारी कामांप्रमाणेच या कामातही प्रचंड दिरंगाई होत आहे. आणि दिवसेंदिवस बळींची संख्या वाढतच आहे. हे सगळं पाहून न राहावल्याने नीरज कुमार यांनी स्वत: रस्त्यांसाठी लागणाऱ्या मातीचा ट्रक मागवून त्यांनी  त्यांच्या सहकाऱ्यांना बोलावून स्वत: त्या कामाला लागले. त्यांच्या अर्थाअर्थी काही संबंध नसताना त्यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे सगळीकडे त्यांची वाहवा होते आहे.

याच्याच बरोबरीने अमरोहीमध्ये उघड्यावर शौचाला जाण्याचं प्रमाण मोठं आहे. याविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली आहे. उघड्यावर लोकांनी शौचाला जाऊ नये यासाठी त्यांनी जागृती मोहीम हातात घेतली आहे. तसंच अशा ठिकाणांचीही त्यांनी स्वच्छता केली आहे. या ठिकाणाजवळच्या रहिवाशांसाठी इथल्या घाणीमुळे जगणं मुष्किल होऊन बसलं होतं. आता पोलिसांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये नीरज कुमार यांचं नाव अतिशय आदराने घेतलं जाऊ लागलं आहे.

सुधारणा करायला काय लागतं? फार मोठी यंत्रणा? मोठी राजकीय ताकद? की आर्थिक ताकद. असा छोटा पण महत्त्वाचा बदल घडवून आणायला लागते ती फक्त इच्छाशक्ती.

पोलीस स्टेशन इनचार्ज हे पद काही फार वरिष्ठ नाही. पण या पदावरच्या व्यक्तीनेही  ठरवलं तर समाजात लक्षणी बदल घडवता येतात हे नीरज कुमार यांच्या उदाहरणाने पटवून दिलं आहे.