जयपुरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या अमेरिकन ब्लॉगर कोलीन ग्रेडी हिचा फोन चोरीला गेल्यानंतर तिनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर भारतीयांवर नाराजी व्यक्त केली आहे. भारतीयांची फोन घेण्याची लायकी नसल्याचं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भारतीय युजर्सनं तिच्यावर टीका केली आहे.

‘भारतासारख्या देशात जिथे किड्यामुंग्यांसारखी गर्दी लोकांची असते तिथे माझा आयफोन एक्स हरवला. खरं तर इथल्या लोकांची आयफोन खरेदी करण्याची लायकीच नाही. इथल्या बहुकेत लोकांच्या वर्षिक उत्पन्नापेक्षा माझ्या फोनची किंमत जास्त आहे. अशा गरीब आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात माझा फोन हरवला होता. तो मला परत मिळेल अशी मला अजिबात आशा नव्हती, हा फोन ज्या व्यक्तीला सापडेल ती व्यक्ती या फोनचं काय करणार हेच मला समजत नाही’ असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं होतं.

सुदैवानं फोन तिचा एका व्यक्तीला सापडला. त्यानं हा फोन तिला त्याचदिवशी परत दिला. मात्र या गोष्टीचं कौतुक करण्यापेक्षा तिनं आपल्या पोस्टमधून भारतीयांवर टीका करणं सुरूच ठेवलं.. ‘या देशात आयफोन कोण वापरू शकतो यावर माझा विश्वासच बसत नाही. आश्चर्य म्हणजे माझा फोन ज्या व्यक्तीनं परत केला त्या व्यक्तीकडेच आयफोन एक्स होता’ असं तिनं म्हटलं. उलट मदत करणाऱ्या भारतीयांचं कौतुक करण्याऐवजी तिनं लिहिलेली आक्षेपार्ह पोस्ट अनेक भारतीयांना पटली नाही म्हणूनच तिच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली.

कोलीन योग प्रशिक्षक आणि इन्स्टा ब्लॉगर आहे. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आणि भारतीय युजर्सकडून कडवे बोल ऐकावे लागल्यानंतर कोलीननं आपली पोस्ट सोशल मीडियावरून डीलिट केली.