विमान प्रवासात जेवणासोबत मिळालेलं सफरचंद न खाता ते बॅगेत ठेवणं अमेरिकन महिलेला चांगलचं महागात पडलं आहे. या एका चुकीसाठी तिला तब्बल ३३ हजार रुपये मोजावे लागले आहेत.

ख्रिस्टल टॅडलॉक ही महिला पॅरिसहून अमेरिकेला विमानानं प्रवास करत होती. या प्रवासादरम्यान तिनं सफरचंद खाण्यासाठी घेतलं. पण, ते न खाताच पुढच्या प्रवासासाठी तिनं वाचवून ठेवलं होता. डेल्टा एअरलाइन्सकडून मिळालेलं हे सफरचंद बॅगेत ठेवण्याचा मोह तिला अनावर झाला खरा पण यासाठी तिच्याकडून ५०० डॉलर म्हणजे अंदाजे ३३ हजारांचा दंड आकारण्यात आला.

अमेरिकन नियमानुसार एखादं कृषीउत्पादन विमानमार्गानं देशात आणायचं असेल तर संबधीत व्यक्तीला विमानतळावर त्याची माहिती देणं बंधनकारक असते. पण, ख्रिस्टलनं मात्र तसं केलं नव्हतं. विमानतळावर बॅग तपासताना तिच्या बॅगेत कस्टम अधिकाऱ्यांना सफरचंद आढळलं. अर्थात विमानतळावर तिनं याची माहिती न दिल्यानं तिच्याक़डून हा दंड आकारण्यात आला. हे फळ मला आधिच्या विमानप्रवासात मोफत मिळालं आहे, सफरचंदाच्या पॅकेजिंगवर  डेल्टा एअरलाईन्सचा लोगो आहे हे तिनं पटवून देण्याचा प्रयत्न केला पण, अखेर कायद्यापुढे तिचं चालेना. शेवटी न खाल्लेल्या सफरचंदासाठी तिला एवढी मोठी किंमत मोजावी लागली.