प्रीमियम स्मार्टफोन निर्माता दिग्गज कंपनी Apple ने आपल्या आयफोन्समध्ये प्रत्येक जनरेशनसह काही बदल केलेत. पण, हे बदल अनेकदा युजर्सना आवडत नाहीत.काही दिवसांपुर्वीच कंपनीने आपले नवीन आयफोन सीरिज 11 लाँच केली.या फोनमध्ये कंपनीने अनेक शानदार फीचर्स दिलेत. मात्र एक फीचर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना आवडलेलं नाही.

नव्या आयफोनमधील फीचर न आवडल्याने ट्रम्प यांनी थेट Apple कंपनीचे सीईओ टिम कुक यांच्याकडेच नाराजी व्यक्त केलीये. ट्विटरद्वारे ट्रम्प यांनी कुक यांच्याकडे नाराजी व्यक्त करताना, “सध्याच्या स्वाइप फीचरपेक्षा आयफोनमधील बटण कितीतरी उत्तम होतं”, असं म्हटलंय.

कोणत्या बटणाबाबत बोलतायेत ट्रम्प –
जुन्या आयफोनमध्ये अनलॉक केल्यानंतर होम स्क्रीनवर येण्यासाठी ‘होम बटण’ असायचं, तर आता नव्या आयफोनमध्ये वरच्या बाजूला स्वाइप करावं लागतं. कंपनीने 2017 मध्ये लाँच केलेल्या आयफोन X या मॉडेलपासून डिझाइनमधून, फिजिकल बटन हटवलं. त्यानंतर, नुकत्याच लाँच झालेल्या आयफोन 11 मालिकेतील फोनमध्येही होम बटण देण्यात आलेलं नाही.


दरम्यान, ट्रम्प यांच्या या ट्विटवर कुक यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.