सासू-सूनेचं भांडण कानावर येणं यात काहीच नवीन नाही , कारण बहुतांश घरांमध्ये सासू-सून म्हटलं ही भांड्याला-भांडं हे लागतंच. पण, उत्तर प्रदेशमधून सासू-सूनेच्या भांडणाचा एक आगळा वेगळा किस्सा समोर आला आहे. सून भाजीला कांद्याची फोडणी देते म्हणून तक्रार करण्यासाठी येथील विलासपूर परिसरातील एका सासूने गुरुवारी चक्क पोलीस ठाण्‍यात धाव घेतली आणि चांगलाच गोंधळ घातला.

दनकौर कोतवाली भागातील विलासपूरमध्‍ये राहणार्‍या ८० वर्षांच्‍या वृद्ध महिलेला खाण्यात कांदा अजिबात आवडत नाही. ‘मला कांदा आवडत नाही हे सूनबाईला माहीत आहे. तरीही वारंवार ती भाजीला कांद्याची फोडणी देत असते’, आणि यामध्ये माझ्या मुलाचीही सूनेला साथ आहे’, अशी तक्रार करण्यासाठी या सासूबाई पोलीस स्थानकात पोहोचल्या होत्या. त्यांची तक्रार ऐकून पोलीस देखील चक्रावले आणि हे तुमचं घरगुती प्रकरण आहे असं पोलिसांनी सांगितलं. मात्र, सासूबाई काहीही ऐकण्याच्या तयारीत नव्हत्या. ‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार, अखेरीस पोलिसांनी सासूबाईंची समजूत काढण्‍यासाठी त्यांच्या मुलाला बोलावलं. त्यानंतर  ‘इथून पुढे भाजीला कांद्याची फोडणी देणार नाही’ असं मुलाने सांगितल्यावर सासूबाई शांत झाल्या आणि घरी परतल्या.