उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या तीन मुलांचा शोध गुलरिया पोलिसांना लावलाय. ही तिन्ही मुलं सुखरुप आहेत. विशेष म्हणजे मोबाइलवरील पबजी हा गेम खेळण्यापासून पालकांनी नकार दिल्याने आणि ओरडल्याने ही तिन्ही मुलं स्वत:च्या इच्छेने घरातून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. घरातून पळून गेल्यानंतर ही मुलं लखनऊला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर पोहचली. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर तपास यंत्रणांच्या मदतीने अवघ्या १२ तासांमध्ये या मुलांना शोधून काढत गोरखपूर रेल्वे स्थानकाच्या आवारातून ताब्यात घेतलं. ही तिन्ही मुलं १२ ते १५ वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचं न्यूज १८ ने म्हटलं आहे.

पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेतल्यानंतर या मुलांची माहिती देणाऱ्याला २५ हजारांचं बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिनेश कुमार प्रभु यांनी दिलीय. तसेच सोशल नेटवर्किंगवरही या बेपत्ता झालेल्या मुलांचे फोटो व्हायर करण्यात आले होते. या सर्व मदतीमुळेच अवघ्या १२ तासांमध्ये या मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं आणि या मुलांना पुन्हा त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. गुलरिया पोलीस स्थानकाचे प्रमुख विनोद अग्निहोत्री यांनी मुलांना गोरखपूर रेल्वे स्थानकाजवळून ताब्यात घेण्यात आल्याचं सांगितलं. आम्ही मोबाइल घेण्यासाठी पैसे कमवण्याच्या उद्देशाने लखनऊला चाललो होतो, असं या मुलांनी पोलिसांना सांगितल्याचंही अग्निहोत्री म्हणाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिन्ही मुलेही आपले पालक मोबाईलवर पबजी गेम खेळू देत नसल्याने नाराज होती. त्यामुळे त्यांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात त्यांनीच पोलिसांना माहिती दिली. मात्र पोलिसांनी योग्य प्रकार तपास करत ही मुलं गोरखपूर सोडून जाण्याआधीच त्यांना रेल्वे स्थानकाजवळून ताब्यात घेतलं आणि त्यांच्या आई वडिलांकडे सुपूर्द केलं. घरातून पळून गेलेल्या मुलांची नावं रोहन सिंह चौहान, रवि चौहान आणि प्रतूर गौर अशी आहेत. ही मुलं मंगळवारी रात्री आपआपल्या घरातून अचानक पळून गेली होती. आपल्या घरच्यांनी पबजी आणि फ्री फायरसारखे ऑनलाइन गेम खेळवण्यावर निर्बंध घातल्याने ही पोरं नाराज होती. बुधवारी या मुलांना त्यांच्या नातेवाईकांनी संपूर्ण शहरामध्ये शोधलं. मात्र त्यानंतरही मुलांचा तपास लागला नाही तेव्हा त्यांनी पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी मुलं बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करुन घेत बुधवारी रात्रीच्या सुमारास आपली तपास यंत्रणा कामा लावली आणि गुरुवारी दुपारपर्यंत या मुलांचा शोध लावला.