सध्या देशभरात करोनानं थैमान घातलं आहे. वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी, तसंच अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करत आहे. इतरांच्या सुरक्षेसाठी ते आपल्या कुटुंबीयांचाही विचार करत नाही. अशीच एक पोलीस आई आपल्या तान्हुलीला कडेवर घेऊन या आपलं कर्तव्य बजावत करोनाविरोधात लढा देत आहे. ती आई आपल्या आईच्या कर्तव्योसोबतच आपलं समाजाप्रती असलेलं कर्तव्य डोळ्यात तेल घालून पार पाडत आहे.

उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथील वरिष्ठ पोलीस आपल्या मुलीला कडेवर घेऊन आपलं कर्तव्य बजावत आहेत. नीशू कडियान असं त्या पोलीस आईचं नाव आहे. उत्तर प्रदेशात लॉकडाउनचं पालन करण्यासाठी सरकारनं एक पोलिसांची टीम तयार केली आहे. नीशू कडियान या त्यातीलच एका टीमचा भाग आहेत.

आपलं आई म्हणून असलेलं कर्तव्य आणि समाजाप्रती असलेलं कर्तव्य त्या खंबीरपणे पार पाडत आहेत. त्यांची एक वर्षाची मुलगी घरी आजारी होती. त्यामुळे तिला घरी सोडणं योग्य नसल्याचं त्यांना वाटलं. तसंच करोनामुळे त्यांना सुट्टी घेणंही शक्य नव्हतं. त्यामुळे त्या आपल्या तान्हुलीला घेऊनच आपल्या पीएससी कँप बाहेर कर्तव्यावर पोहोचल्या. “माझी मुलगी दोन दिवसांपासून आजारी होती. तसंच तिला माझी गरज होती आणि तिला सोडून मी कामावर जाऊ नये असं तिला वाटत होतं. म्हणूनच मी तिला कडेवर घेऊन कामावर जाण्याचा निर्णय घेतला,” असं नीतू कडियान म्हणाल्या.