अनेकदा एखादी छोटी चूक फार महागात पडते आणि त्यासाठी मोठी किंमत चुकवावी लागते. असाच प्रकार उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून समोर आला आहे. एका महिलेने तिला नॉन व्हेज पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या अमेरिकी पिझ्झा रेस्तराँकडे तब्बल एक कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. महिलेने याप्रकरणी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली आहे. सध्या ही घटना सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरलीये.

काय आहे घटना?
गाझियाबादच्या रहिवासी दिपाली त्यागी या शाकाहारी असून त्यांनी दोन वर्षांपूर्वी २१ मार्च २०१९ रोजी होळीच्या दिवशी एका अमेरिकी पिझ्झा रेस्तराँमधून व्हेज पिझ्झा ऑर्डर केला होता. पिझ्झा डिलिव्हरीला उशीर झाला होता, पण भूक लागल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करत आम्ही सगळे पिझ्झा खायला बसलो. पण पिझ्झामध्ये मशरुमऐवजी मांस असल्याचं मला पहिला घास खाताना जाणवलं असं दिपाली यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितलं.

आणखी वाचा- Zomato डिलीव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर प्रकरणात नवं वळण, ‘त्या’ तरुणीविरोधातच FIR दाखल

दिली होती मोफत पिझ्झा देण्याची ऑफर :
दरम्यान, दिपाली यांचे वकील फरहत वारसी यांनी ग्राहक कोर्टाला सांगितले की, याबाबत महिलेनं पिझ्झा कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून तक्रारही केली होती, मात्र कंपनीनं या बाबीकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही. चार दिवसांनी पिझ्झा आउटलेटच्या व्यवस्थापकांनी दिपाली यांना फोन केला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला मोफत पिझ्झा देण्याची ऑफर दिली. परंतु या घटनेमुळे मानसिक त्रास वाढला असून आयुष्यभर महागडे धार्मिक विधी करावे लागतील, असं सांगत त्या महिलेने ऑफर नाकारली, अशी माहिती वकिलांनी दिली. नंतर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार केली. दरम्यान दिपाली यांच्या तक्रारीनंतर दिल्लीच्या जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने पिझ्झा आउटलेटला महिलेच्या तक्रारीवर उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 मार्च रोजी ठेवण्यात आली आहे.