पाठीवर वयस्क भाविकाला रुग्णालयापर्यंत वाहून नेणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे लोकेंद्र बहुगुणा. उत्तराखंड पोलीस दलात पोलीस उपनिरिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. वैष्णो देवीच्या दर्शनाला आलेल्या एका वयस्क भाविकाची तब्येत अचानक बिघडली. वाहतूक ठप्प होती, रुग्णालयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग नव्हता. अशा कठीण परिस्थितीत त्या भाविकाला वेळेवर रुग्णालयात पोहोचवण्यासाठी लोकेंद्र यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. या भाविकाला पाठीवर वाहून त्यांनी दोन किलोमीटरचा अवघड रस्ता  पार केला आणि त्याला वेळीच रुग्णालयात पोहोचवलं त्यामुळे लोकेंद्र यांचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

उत्तराखंड पोलीस दलाच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून हा किस्सा शेअर करण्यात आला  आहे. भैरव घाटी दरम्यान वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी मध्य प्रदेशमधून आलेले भाविक रांझी राजक यांच्या छातीत दुखू लागले. वाहतुकीची कोंडी झाल्यानं त्यांना एखाद्या वाहनानं रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यास अडचण येत होती. घोडा किंवा खेचरावरून रुग्णालयात पोहोचवण्याचा एकमेव पर्याय लोकेंद्र यांच्यापुढे होता पण, छातीत दुखत असल्यानं त्यांना बसता येत नव्हतं अशावेळी लोकेंद्र यांनी रांझी यांना आपल्या पाठीवरून वाहून रुग्णालयापर्यंत पोहोचवलं.

भैरव घाटातून यमुनोत्री रुग्णालय केंद्रापर्यंतचा मार्ग खडतर होता. चढ उतार होते पण लोकेंद्र यांनी जीव धोक्यात घालून रांझी यांना रुग्णालयात पोहोचवलं, म्हणूनच त्यांच सोशल मीडियावर कौतुक होत आहे.