आर्थिक संकटाचा सामना करणारी दूरसंचार क्षेत्रातील व्होडाफोन आयडिया कंपनी आता Vi नावाने ओळखली जाणार आहे. कंपनीने आज आपल्या रिब्रॅण्डींगची घोषणा केली. या कंपनीचा मालकी हक्क ब्रिटनमधील व्होडाफोन आणि आदित्य बिर्लांच्या कंपनीकडे आहे. आज कंपनीने केलेल्या घोषणेनंतर त्यांच्या प्रमुख स्पर्धकांपैकी एक असणाऱ्या जिओने त्यांचे हटके पद्धतीने अभिनंदन केलं आहे. जिओच्या ट्विटर अकाऊंटवरुन व्होडाफोन आणि आयडियाला टॅग करुन एक ट्विट करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये कंपनीच्या नव्या नावाचा अगदी कल्पकतेने वापर करण्यात आला आहे.

रिलायन्सने जिओच्या माध्यमातून दूरसंचार क्षेत्रामध्ये पदार्पण केल्यानंतर व्होडाफोन आणि आयडिया कंपनीने विलीनीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता कंपनीने दोन्ही कंपन्यांची नाव एकत्र करुन Vi नावाचा ब्रॅण्ड लॉन्च केला आहे. याच निर्णयाचे स्वागत करताना जिओने दोन्ही कंपन्यांना नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अगदी सहा ओळींचं छोटं प्रेमपत्रच जिओने या दोन कंपन्यांना लिहिलं आहे. “वी लव्ह टू सी यू टूगेदर” म्हणजेच तुम्हाला दोघांना एकत्र बघून आम्हाला आनंद झाला असं जिओनं म्हटलं आहे. यामधील वी म्हणजे आम्हाला हा शब्द WE असा न वापरता व्होडाफोन आणि आयडियाची नवीन ओळख असणारे ब्रॅण्डनेम म्हणजेच ‘Vi’ असा वापरला आहे. त्याच प्रमाणे जिओने स्वत:च्या नावाचाही कल्पकतेने वापर करत व्हिडाफोन आणि आयडियाला ‘जिओ टूगेदर’ म्हणजेच असेच एकत्र राहा असा मजेदार सल्लाही दिला आहे. तसेच पुढे जिओकडून खूप सारं प्रेम या अर्थाचा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे. तसेच डोळा मारणारा इमोन्जीही जिओच्या ट्विटमध्ये वापरण्यात आला आहे.

या घोषणेपुर्वी व्होडाफोननेही सकाळी आयडियाला आजच्या मोठ्या घोषणेसाठी तयार आहेस का असा प्रश्न ट्विटवरुन विचारला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना आयडियाच्या हॅण्डलवरुन, “होय. मला धीर धरवत नाहीय,” असं उत्तर देण्यात आलं होतं.

दरवाढ अटळ?

एकीकडे व्होडाफोन आणि आयडियाने नव्या ब्रॅण्डीच घोषणा करण्याबरोबरच कंपनीने सेवांचे दर वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिल्याने भविष्यात कंपनीच्या ग्राहकांना थोडा खिसा हलका करावा लागण्याची शक्यता आहे. कंपनीचे कार्यकारी अधिकारी रविंद्र टक्कर यांनी नवीन ब्रॅण्डची घोषणा करताना, “व्होडाफोन आणि आयडियाचे विलीनीकरण दोन वर्षांपूर्वी झालं होतं. तेव्हापासून या दोन्ही मोठ्या कंपन्या आमचे सर्व काम आणि कार्यपद्धती एकाच प्रकार करण्यासाठी काम करत होते. आज Vi हा ब्रॅण्ड तुमच्या समोर घेऊन येताना मला खूपच आनंद होत आहे,” असं सांगितलं. या घोषणेबरोबरच दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता हा ब्रॅण्ड Vi नावाने ओळखला जाईल.

खरी स्पर्धा एअरटेल आणि जिओबरोबरच

पहिला टप्पा म्हणून आम्ही दरवाढ करण्याचा विचार करत आहोत. नवीन दरवाढ केल्याने कंपनीला एआरपीयू (एव्हरेज रेव्हेन्यू पर युनिट) सुधारणा करण्यासाठी वाव मिळेल. सध्या कंपनीचा एआरपीयू ११४ रुपये इतका आहे. तर एअरटेल एआरपीयू १५७ रुपये आणि जिओचा १४० रुपये इतका आहे.

त्या निधीचा होणार फायदा

यापूर्वी व्होडाफोन आयडियामध्ये दूरसंचार क्षेत्रातील अमेरिकेतील आघाडीची कंपनी असणारी वेरिजॉन आणि ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन ४ अरब डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे वृत्त समोर आलं होतं. मात्र हे वृत्त कंपनीने फेटाळून लावलं होतं. सध्या आमच्याकडे अशाप्रकारचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. कंपनीच्या कार्यकाळी मंडळाने इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून ग्लोबड डिपॉझिटर रिसीट, अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट आणि परदेशी चलनाच्या बॉण्ड्सबरोबरच कन्व्हर्टीबल डिबेंचर्सच्या माध्यमातून २५ हजार कोटींची रक्कम उभी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.  यामुळे आर्थिक संकटात अडकलेल्या ViL ला बराच फायदा होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.