चीनमधील इंजीनियर्सने नुकतीच एक भन्नाट गोष्ट केली आहे. या इंजीनियर्सने एक सात हजार ६०० टन वजनाची संपूर्ण इमारतच न तोडता एका जागेवरुन दुसरीकडे हलवली आहे. ही इमारत म्हणजे शांघाय शहरातील एक शाळा आहे. या शाळेचे बांधकाम १९३५ साली म्हणजेच ८५ वर्षांपूर्वी करण्यात आलं होतं. शाळेची इमारत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करत या इंजीनियर्सने जगभरातील इंजीनियर्ससमोर एक उदाहरण ठेवलं आहे.

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिथे ही शाळेची इमारत आहे तिथे एका नव्या वस्तूचे निर्माण केलं जात आहे. ही इमारत ऐतिहासिक असल्याने ती तोडण्याऐवजी इंजीनियर्सने तिला एका ठिकाणाहून दुसरीकडे शिफ्ट करण्याचा ठरवलं आणि त्यामध्ये त्यांना यश आलं.

चीनमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार इमारत स्थलांतरित करण्यासाठी १९८ रोबोटिक टूल्सचा वापर करण्यात आला. हजारो टन वजनाच्या इमारतीची थोडीही पडझड न होऊ देता तिला ६२ मीटर दूर सरकवण्यात आलं. चीनमधील सीसीटीव्ही न्यूज नेटवर्कने दिलेल्या माहितीनुसार हे काम एकूण १८ दिवस सुरु होतं. १५ ऑक्टोबर रोजी हे काम पूर्ण झालं.

आतापर्यंत अशापद्धतीने इमारत हलवण्यासाठी मोठ्या प्लॅटफॉर्मवर किंवा जास्त क्षमता असणाऱ्या क्रेनची मदत घेतली जात होती. मात्र चीनमधील ही शाळा स्थलांतरित करण्यासाठी रोबोटिक लेग्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. याच रोबोटिक लेग्सच्या मदतीने संपूर्ण इमारत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. याच संपूर्ण प्रक्रियेचा टाइम लॅप्स व्हिडीओही व्हायरल झालाय. यापूर्वी २०१७ मध्ये १३५ वर्ष जुन्या आणि दोन हजार टन वजणाऱ्या ऐतिहासिक बौद्ध मंदिरालाही ३० मीटर दूर सरकवण्यात आलं होतं. या कामासाठीही १५ दिवसांचा कालावधी लागला होता.