सध्या सोशल मीडियावर एका डॉक्टरनं गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या डॉक्टरांनी ज्या कारणासाठी गाणं गायलं आहे व जिथं गायलं आहे, ते पाहून व त्यामागचे कारण समजल्यावर तर अनेकांनी त्यांची प्रचंड स्तुती केली आहे. एवढच नाही तर त्यांचा गाण्याचा व्हिडिओ देखील तुफान शेअर केला जात आहे. धुळे येथील संगोपन रूग्णालयाचे डॉ. अभिनय दरवडे असा त्यांचा परिचय आहे.

डॉ. अभिनय दरवडे यांनी आपल्या रूग्णालयातील एक किस्सा फेसबुकवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ते म्हणतात, “आमच्या NICU मधल्या ९०० ग्राम वजनाच्या या चिमुकल्याला झोपच येत नव्हती! कालपासून त्याचा ऑक्सिजन निघालाय, दूध प्यायला लागलाय तशी ताकद आलीय त्याला! मग काय रात्री रडायला सुरुवात! NICU मधल्या आजूबाजूच्या दुसऱ्या पिटुकल्या बाळांना त्रास होईल इतक्या जोरात साहेबांनी रडायला सुरुवात केली! रडणं काही थांबेना! मग त्याला जरा बाहेर आणलं (केबिन मध्ये)आणि गाणं म्हटलं, तसं ते शांत होऊन गाणं ऐकू लागलं, आणि नंतर दोन तीन गाणी म्हटल्यावर झोपी गेलं! इवलंसं आहे पण स्वतःला काय हवं ते बरोबर मिळवून घेतलं पठ्ठ्याने!”

या फेसबुक पोस्टबरोबर त्यांनी बाळाला हातात घेत त्याला शांत करण्यासाठी गाणी म्हणत असल्याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडिओला प्रचंड लाईक्स मिळत असून, मोठ्याप्रमाणावऱ शेअर केलं जात आहे. डॉक्टरांचा आवज देखील अतिशय सुरेख असल्याने, अनेकांने त्याबद्दलही कौतुक केलं आहे.

“बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि डॉक्टरांची कला गळ्यात… वाटतंय बाळ गायक होणार..”अशी एकाने फेसबुकवर प्रतिक्रिया दिली आहे. तर, “रसिक बाळ दिसतय आणि त्याचे लाड पुरवणारे डॉक्टर पण भारीच.. ”असं अन्य एकजणाने म्हटलं आहे. “वात्सल्याचा झरा कसा खळ – खळ वाहतोय… सलाम डॉक्टर! अश्याच माणसांसाठी हे प्रोफेशन आहे..”, “आवाजातच नाही तर वृत्तीतून ही वात्सल्य प्रेम व्यक्त होत आहे डॉक्टर साहेब… सेवेला जेव्हा समर्पण प्राप्त होते तेव्हा मिळणारे समाधान व्यक्त करता येत नाही…” अशा देखील काही प्रतिक्रिया आल्या आहेत.