शार्क असे नुसते ऐकले तरीही आपले धाबे दणाणते. हा मासा मोठा असल्याने त्याच्याबाबत जलचरांनाच नाही तर मानव आणि इतर प्राण्यांनाही भिती वाटते. या माशाने नुसते दर्शन दिले तरी आपल्या शरीरात कापरे भरेल. या महाकाय अशा शार्कने समुद्रात असणाऱ्या वेगवेगळ्या जलचरांना गिळल्याचे आपण अनेकदा ऐकले असेल. पण शार्कला कोणी गिळल्याचे तुम्ही कधी ऐकलंय? बहुदा नाहीच. पण अमेरिकेतील फ्लोरिडा येथे नुकतीच एक घटना घडली असून याठिकाणी एका माशाने शार्कला गिळले आहे. मासेमारी करणाऱ्यांना पाहून त्यांच्या जाळ्यात अडकण्याच्या बेतात असलेल्या एका शार्कला या माशाने गिळल्याचे पहायला मिळाले.

एव्हरग्लेडस फिशिंग कंपनीने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन याचा व्हिडियो अपलोड केला असून तो सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये जवळपास ५०० पौंड वजनाचा गोलियाथ ग्रुपर म्हणजेच ज्यूफिश हा मासा मासेमाऱ्यांच्या जाळ्यात अडकणाऱ्या तीन फूटांच्या लांब शार्क माशाला गिळताना दिसत आहे. गल्फ ऑफ मॅक्सिको या भागात ही घटना घडली असून टूर गाईड असलेल्या जिमी व्हीलर यांनी या घटनेचे चित्रिकरण केले आहे. आतापर्यंत हा व्हिडियो ७२ हजार जणांनी पाहिला आहे. नोटीझन्सनी हा व्हिडियो पाहून त्यावर चांगल्या वाईट कमेंटसही केल्या आहेत. फ्लोरिडामध्ये १९९०मध्ये गोलियाथ ग्रुपर या प्रजातीला संरक्षित प्रजाती म्हणून दर्जा मिळाला. त्यांना समुद्रातील कचरा साफ करणारी प्रजाती म्हणूनही ओळखले जाते.