ऑस्ट्रेलिया हा देश कांगारुंचा देश म्हणून ओळखला जातो. सध्या रशियात सुरु असलेल्या फिफा विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा संघ खेळत असला, तरीही कॅनबेरा येखील एक स्थानिक फुटबॉलचा सामना सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. कॅनबेरामधील पार्लमेंट हाऊसपासून २ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या मैदानात, कॅनबेरा फुटबॉल क्लब आणि बेलकॉनेन युनायडेट ब्लू डेव्हिल्स या महिला संघात सामना सुरु होता. सामना सुरु असताना मैदानात एका कांगारुने कुंपण ओलांडून प्रवेश केला आणि संपूर्ण सामन्यात धमाल उडवून दिली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

कांगारुने फुटबॉलच्या मैदानात प्रवेश केल्यामुळे महिलांचा हा फुटबॉल सामना तब्बल २० मिनीट थांबून राहिला. ऑस्ट्रेलियातील स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एखादा प्राणी मानवी वस्तीत येण्याची ही घटना दुर्मिळ आहे. याआधी कॅनबेरात असे प्रकार कधीही घडले नव्हते. फुटबॉलच्या मैदानात शिरल्यावर कांगारुने काहीकाळासाठी फुटबॉलचा आनंदही लुटला. काहीकाळासाठी गोलपोस्टच्या समोर उभं राहून कांगारुने गोलकिपरचीही भूमिका बजावली. जेरबंद करण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या गाडीलाही कांगारुने चांगलचं दमवलं. त्यामुळे कांगारुला पकडण्यासाठी पोलिसांची ही धावफळ सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते आहे.