काळ आला होता पण वेळ नाही ही म्हण आपण बऱ्याचदा ऐकतो. पण त्याचे प्रत्यंतर काय असते याची आपल्याला कल्पना नसते. नुकत्याच घडलेल्या एका घटनेवरुन त्याचा प्रत्यय आला आहे. उत्तर प्रदेशमधील मथुरा रेल्वे स्टेशनवर झालेल्या अपघातात चालत्या रेल्वेखाली जाऊनही एका चिमुकलीला साधे खरचटलेही नाही. अंगावर काटा आणणारा या घटनेचा व्हिडियो नुकताच समोर आला आहे. मथुरा रेल्वे स्टेशनवर एक वर्षाची मुलगी प्लॅटफॉर्मवरुन खाली रेल्वे रुळावर पडली. आता ही लहानगी कशी पडली याबाबत माहिती समोर आली नाही. त्याचवेळी या रुळांवरुन भरधाव रेल्वे गेली.

इतक्या वेगाने रेल्वे गेल्याने या चिमुकलीचे काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणारे सर्वच जण श्वास रोखून याठिकाणी उभे होते. ही मुलगी रेल्वे रुळावर पाठीवर पडलेली असल्याने ती हालचालही करु शकत नाही. व्हिडियोमध्ये ही घटना जशीच्या तशी कैद झाली आहे. रेल्वेचे शेवटचे डबे जातात आणि एक व्यक्ती या चिमुकलीला उचलण्यासाठी क्षणाचाही विलंब न लावता रेल्वे रुळावर उतरते. चिमुकलीला कडेवर उचलून घेत प्लॅटफॉर्मवरील महिलेकडे देण्यात येते. यावेळी या लहानगीला कोणतीच इजा झाली नसल्याचे दिसते. या बाळाला महिलांनी कडेवर घेतल्यावर ते घाबरलेले असल्याने जोरजोरात रडत असल्याचेही दिसत आहे. या लहानगीची आणि तिच्या पालकांची मात्र ओळख पटलेली नाही. पण सोशल मीडियावर हा व्हिडियो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.