पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक अनोखी घटना घडलीये. धावपट्टीवर उभ्या असलेल्या एका विमानावर चक्क मधमाशांनी हल्ला केला. विस्तारा एअरलाइन्सच्या विमानावर मधमाशांनी हल्ला केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडिओमध्ये कोलकाता येथील विस्तारा एअरलाईनच्या विमानावर मोठ्या संख्येने मधमाशा बसलेल्या दिसतायेत. मधमाशांची संख्या इतकी जास्त आहे की विमानावर एखादा मोठा काळा डाग किंवा छिद्र पडल्याप्रमाणे दिसत आहे. या विमानावर एवढ्या मधमाशा बसल्या होत्या, की त्यांना हटवण्यासाठी अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. अखेर अग्निशमन दलाने वॉटर जेट स्प्रेचा वापर करुन मधमाशांना हटवल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.


30 नोव्हेंबरचा हा व्हिडिओ असून या घटनेमुळे विमानाला जवळपास एक तास उशीर झाल्याचंही सांगितलं जात आहे. यापूर्वी गेल्या वर्षीही अशी घटना कोलकाता विमानतळावरच घडली होती. त्यावेळी मधमाशांच्या हल्ल्यामुळे कोलकातावरुन आगरताळाला जाणाऱ्या विमानाला उड्डाण घेण्यास जवळपास अडीच तास उशीर झाला होता.