एकीकडे कार उत्पादक कंपन्याकडून स्वयंचलित कार निर्मितीसाठी चाचण्या घेतल्या जात असताना, दुसरीकडे तामिळनाडूमधील रस्त्यावर चालत असलेल्या एका स्वयंचलित कारच्या व्हिडिओने नेटकऱ्यांना गोंधळात टाकले आहे.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक वयस्कर व्यक्ती चालकाच्या सीटच्या बाजूला बसला असून, चालकाची सीट रिकामीच दिसत आहे.

या व्हिडिओवर भन्नाट कमेंट देखील येत आहेत. फेसबुकवर युजर्स असलेल्या टागोर यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, आज मी पाहिलं, एक वयस्कर व्यक्ती त्याची पद्मीनी कार प्रवासी सीटवर बसून चालवत आहे. हे कसं शक्य आहे.?

अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट दिल्या आहेत. काहींनी यावर तर्क देखील लावले आहेत. तर काहींनी सांगितलं आहे की कारचं स्टेअरिंग खोटं आहे. अशाप्रकारच्या कार ड्रायव्हिंग स्कुलमध्ये असतात.

तर, एका फेसबुक युजरने या व्हिडिओ मागील सत्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे म्हणने आहे की त्याने या व्यक्तिला अशाप्रकारे कार चालवताना प्रत्यक्षात पाहिलं आहे. तो म्हणाला, “युक्ती अशी आहे की, कारचं समोरचं सीट हे सलग मोठं सीट आहे. स्टेअरिंगच्या खाली गिअर आहेत. जेव्हा ही कार टॉप गिअरमध्ये महामार्गावर आली, तेव्हा चालकाने पटकन जागा बदलली व तो शेजारच्या सीटवर बसला. तो ड्रायव्हिंग स्कुलप्रमाणे अॅक्सिलरेशन पॅडलचा वापर करत होता. जर काही धोका वाटला तर तो लगेच चालकाच्या जागेवर देखील जात होता.”