राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे हे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमुळे वादात सापडले आहेत. या व्हिडिओत राम शिंदे रस्त्याच्या कडेला उभे राहून उघड्यावर लघुशंका करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मळेगाव येथे जलयुक्त शिवार योजनेतंर्गत केलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी सोलापूर-बार्शी मार्गावर त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबला. त्यानंतर राम शिंदेंनी गाडीतून उतरत रस्त्याच्या कडेलाच लघुशंका केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. राम शिंदे यांना रस्त्यावर लघुशंकेसाठी स्वच्छतागृह न सापडणे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे अपयश आहे. यावरून सरकारने स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली पेट्रोल आणि डिझेलवर लावलेला सेस म्हणजे लूट असल्याचे सिद्ध होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले. भाजपचा एखादा मंत्रीच असे कृत्य करत असेल तर मोदी लोकांकडून शिस्त पाळण्याची अपेक्षा कशी काय करू शकतात? राम शिंदेंचे हे कृत्य एकप्रकारे स्वच्छ भारत अभियानाचे अपयश अधोरेखित करते, असेही मलिक यांनी सांगितले.

‘जलयुक्तमुळे पाणी प्रश्न निकाली’

याबाबत ‘पीटीआय’ने राम शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी म्हटले की, मी गेल्या महिनाभरापासून जलयुक्त शिवारच्या कामांची पाहणी करण्यासाठी दौरा करत आहे. त्यामुळे ही आजारी पडलो आहे. हा प्रकार घडला तेव्हादेखील मला बरं वाटतं नव्हतं. तेव्हा आजुबाजूला कुठेही स्वच्छतागृह दिसलं नाही. त्यामुळे रस्त्यात लघुशंकेला जावे लागलं असे राम शिंदे यांनी म्हटले.