चोरी करण्यासाठी चोर कोणकोणत्या युक्त्या वापरतील याचा नेम नसतो. काही चोर इतके सराईत असतात की सुरक्षा यंत्रणांच्या हातावर तुरी देऊन ते कधी पसार होतात, हेदेखील कळत नाही. आजपर्यंत असे अनेक प्रसंग आपण चित्रपट आणि मालिकांमधून पाहिले असतील.

मात्र, असाच प्रसंग प्रत्यक्षात घडला तर? स्विडीश पोलिसांनी नुकताच फिल्मी स्टाईलनं चालत्या ट्रकमध्ये शिरून चोरी करणाऱ्या चोरांचा पर्दाफाश केलाय. अद्यायावत तंत्रज्ञानाने युक्त अशा कार्गो ट्रकमध्ये शिरून चोरांची ही टोळी सामानावर डल्ला मारायची . ट्रकचा वेग ताशी ८० किलोमीटर असला तरी ही टोळी मोटार सायकलनं ट्रकचा पाठलाग करून, ट्रकच्या मागच्या बाजूला शिरायची. यासाठी ते अनेकदा स्वत:चा जीवही धोक्यात घालत. गाडीच्या चालकाला या सगळ्याचा पत्ताही लागायचा नाही. अनेक मालवाहू ट्रकमधील लाखोंच्या सामानावर या टोळीने डल्ला मारला होता. पण यावेळी पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. ट्रकमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमुळे चोर शिरल्याचे चालकाला लक्षात आले. त्यांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली. तोपर्यंत या चोरांना चोरी करण्याची आयती संधी दिली. ते निर्धास्त होऊन चोरी करेपर्यंत सापळा रचून पोलिसांनी या टोळीला पकडले.

Video : यंत्रमानवानंतर आता यांत्रिक कुत्रा बाजारपेठेत; सोनीचा ‘आईबो’ लाँच