आजकाल सॉफ्ट ड्रिंक पिणाऱ्या तरूणांची संख्या वाटत आहे. अनेकदा सॉफ्ट ड्रिंक्सच्या काचेच्या बाटल्यांचे झाकण उघडण्यासाठी ओपनर मिळाला नाही की ग्रुपमधला एखादा तरूण दाताने बाटली उघडतो. पण एखाद्याने आपल्या डोक्याने सोड्याच्या किंवा कोल्ड ड्रिंक्सच्या बाटल्या उघडताना तुम्ही कधी पाहिलंय का? कदाचित हे तुम्हाला ऐकायला विचित्र वाटेल. तुम्हीही असंही म्हणाल की डोक्याने कोणी अशा बाटल्यांची झाकणं कशी काय उघडू शकतो… पण आंध्र प्रदेशच्या एका तरूणाने हा पराक्रम करून दाखवला आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी आपल्या या पराक्रमाच्या जोरावर विश्वविक्रमही केला आहे.

आंध्र प्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यातील प्रभाकर रेड्डी या तरूणाने एका मिनिटांत चक्क ६८ सोड्याच्या बाटल्यांची झाकणं डोक्याने उघडल्याचा विक्रम केला आहे. या अजब-गजब विक्रमाची थेट गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली असून त्यांनी स्वत: आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून व्हिडीओ पोस्ट केला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या ट्विटमध्ये हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्यासोबत ‘अशाप्रकारचा प्रयत्न कोणीही आपल्या घरी करू नये’, अशी वॉर्निंगही देण्यात आली आहे.

आंध्रपदेशच्या प्रभाकर रेड्डी या तरूणाने एका मिनिटांत तब्बल ६८ बाटल्यांची झाकणं डोक्याने उघडत विश्वविक्रम रचला. यावेळी सुजीत कुमार आणि राकेश हे दोघे त्याचे सहाय्यक होते. आपल्या इमारतीच्या गच्चीत प्रभाकरने हा विश्वविक्रमी प्रयत्न साकारला.