ताडामाडासारखे नारळाचे झाड आणि त्याला लागणारे नारळ पाहिले की हे नारळ कसे काढले जात असतील असा प्रश्न लहानपणी आपल्यातील अनेकांना पडलेला असतो. मोठे होत जातो तसा या प्रश्नाचा उलगडा आपल्याला व्हायला लागतो. कोकणात गेल्यावर कधी प्रत्यक्ष तर कधी व्हिडिओमध्ये नारळ काढण्यासाठी झाडावर सरसर चढणारी माणसे आपण पाहतो. ते पाहून त्यांच्या कौशल्याचे आपल्याला मोठे कौतुक वाटते. नुकताच असाच एक व्हिडीयो व्हायरल होत असून यामध्ये केरळमध्ये एक लहानगी नारळाच्या झाडावर सरसर चढताना दिसत आहे. यातही ती खोडावरुन न चढता झावळीवरुन चढत असल्याचे आपल्याला व्हिडीयोमध्ये दिसते. विशेष म्हणजे इतकी लहान असूनही ही मुलगी अजिबात न घाबरता या झाडावर अवघ्या ५ मिनीटात ही चिमुकली चढते आणि नारळ काढून घेत खालीही उतरते.

या चिमुकलीचे नाव, वय, याबाबत कोणतीही माहिती मिळाली नसली तरीही तिच्यातील धैर्य खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. तसेच कोणत्याही संरक्षणाशिवाय ती हे करत असल्याने काही काळासाठी आपणही हा व्हिडीयो पाहून थक्क होतो. तिच्या या व्हिडीयोला मल्ल्याळी भाषेत कॅप्शन देण्यात आले आहे. यामध्ये ‘भगवान, येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये आम्हाला काय काय पहायला लागणार आहे?’ असा प्रश्न विचारला आहे. शालेय परीक्षा संपून मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने ही चिंता व्यक्त करण्यात येत आहे.