बाजारात गेल्यानंतर बऱ्याचदा विक्रेत्यांकडून भाजी किंवा फळांचे वजन करताना ग्राहकांची फसवणूक झाल्याचे प्रकार आपण ऐकले आणि अनुभवले असतील. सध्या फेसबुकवर असेच काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. छुप्या कॅमेऱ्यांनी हे व्हिडिओ चित्रित करण्यात आले आहेत. यामध्ये विक्रेते ग्राहकांना कोणत्या पातळीपर्यंत जाऊन फसवतात, हे पाहून थक्क व्हायला होते. या फेसबुक पोस्टमध्ये चार व्हिडिओ आहेत. यापैकी पहिल्या व्हिडिओत विक्रेता ग्राहकाला द्यायच्या फळांचे वजन करण्यापूर्वीच हातचलाखीने एक फळ वजनाच्या काट्यावर ठेवून देतो. त्यानंतर विक्रेता ग्राहकाने दिलेल्या फळाच्या परडीचे वजन करताना दिसतो. वजन करून झाल्यानंतरही विक्रेता परडीतील एक फळ हातचलाखीने खाली टाकतो व पिशवी ग्राहकाच्या हातात देतो. तर अन्य दोन व्हिडिओंमध्ये विक्रेते फळे आणि भाज्यांच्या योग्य वजन केलेल्या पिशव्या हातचलाखीने कमी वजन असलेल्या पिशव्यांबरोबर बदलताना दिसतात.