व्हिएतनाममधील सर्वात स्वस्त म्हणून ओळखली जाणारी Vietjet कंपनीची विमानसेवा लवकरच भारतातही सुरू होणार आहे. या वर्षाअखेर ही सेवा भारतात सुरू होणार असल्याच्या चर्चा आहेत. Vietjet ची विमानसेवा जगभरात ‘बिकिनी एअरलाइन्स’ म्हणूनही ओळखली जाते. बिकिनीमधल्या काही मॉडेल्स एअर होस्टेस म्हणून अनेकदा व्हिएतजेटच्या जाहिरातीत दाखवण्यात आल्या आहेत. या बोल्ड जाहिरातींमुळे ही विमानसेवा नेहमीच विवादात सापडली आहे. पण, असं असलं तरी या विमानसेवेला व्हिएतनामी प्रवाशांची मात्र तुफान प्रसिद्धी लाभली आहे.

साधरण जुलै ते ऑगस्टमध्ये दिल्ली ते व्हिएतनाम अशी ही सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विमानात प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या कर्मचाऱ्याच्या पेहरावावरून ही विमानसेवा जगभरात चर्चेत आहे. सवंग प्रसिद्धीमुळे ही विमानसेवा व्हिएतनामधली दुसऱ्या क्रमांकाची विमानसेवा ठरली आहे. भारत व्हिएतनाम संबंधांना ४५ वर्षे पूर्ण होत आहे या पार्श्वभूमीवर ही विमानसेवा सुरू होणार आहे. नवी दिल्ली ते व्हिएतनाममधील Ho Chi Minh शहराला जोडणारी ही सेवा आठवड्यातून चार दिवस सुरू असेल. ही विमानसेवा भारतात वादात सापडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमानात बिकिनी किंवा अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान केलेल्या एअर होस्टेस असणं ही संकल्पनाच अनेकांना न रुचणारी आहे त्यामुळे यावरून वाद होऊ शकतो.

व्हिएतनाममधल्या Nguyen Thi Phuong Thao या महिलेनं ही विमान सेवा सुरू केली होती. Vietjet ही खासगी कंपनी असून या विमानसेवेमुळे होणाऱ्या आर्थिक नफ्यामुळे Nguyen Thi Phuong Thao व्हिएतनामधल्या अब्जाधीशांच्या यादीत जाऊ बसली आहे. बिकिनीतील एअर होस्टेस या संकल्पनेमुळे जगभरात या विमानसेवेची खूप निंदा झाली. जगाच्या तुलनेत ही विमानसेवा निंदनीय असली तरी या विमानसेवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मात्र दिवसागणिक वाढतच आहे आणि याचा बक्कळ फायदा कंपनीला होत आहे.