लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट. त्यामुळे आयुष्याचा जोडीदार योग्य मिळावा ही किमान अपेक्षा प्रत्येक मुलीची किंवा मुलाची असते. हिच अपेक्षा केरळमधल्या २८ वर्षीय ज्योतीचीदेखील आहे. ज्योती लग्नासाठी वर शोधत आहे. आई वडिल नसल्यानं जोडीदार शोधण्याची जबाबदारीही अर्थात तिची स्वत:चीच आहे. त्यामुळे इच्छित वर शोधण्यासाठी तिनं स्वत:चा बायोडेटा तयार केलाय. जो फेसबुकवर तिनं अपलोड केलायं. आतापर्यंत ६ हजारांहून अधिक शेअर तिच्या पोस्टला. इतकंच नाही तर मार्क झकरबर्गलादेखील तिनं लग्न जुळवण्यासाठी गळ घातली आहे.

फेसबुकनं लग्न जुळवणारी मेट्रोमोनियल साईट सुरू करावी अशी विनंती तिनं फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्गला केली आहे. ‘मी सिंगल आहे. लग्नासाठी सुयोग्य वराच्या शोधात मी आहे. पत्रिका जात पात या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. माझे आई – वडिल नाही. मी फॅशन डिझाईनिंगमध्ये बीएससी केली आहे. माझं वय २८ वर्षे आहे. त्यामुळे लग्नासाठी कोणी वधूच्या शोधात असेल तर मला सांगा’ अशी जाहिरात तिनं केली होती.

तिची ही जाहिरात चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्या पोस्टला फेसबुकवर खूपच प्रतिसाद मिळत आहे. मेट्रोमोनियल साईटवर वधू वर शोधताना अनेकदा जास्त त्रास होतो, मध्यस्थाला पैसेही जास्त द्यावे लागतात तेव्हा फेसबुकनं अशा लोकांसाठी नक्कीच सेवा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती तिनं फेसबुकला केली आहे. आश्चर्य म्हणजे फेसबुक देखील लवकरच डेटिंग सेवा सुरू करणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या परिषदेत फेसबुकनं याची अधिकृत घोषणाही केली आहे.