नोकरी करताना आपल्या बॉसकडे सुट्टी मागणं सर्वांना जमत नाही. अनेकांना सुट्टी घेण्यासाठी खोटं बोलावं लागतं. खरंखुरं कारण सांगून सुट्टी घेणारे आणि खरं कारण एकून सुट्टी देणारेही खूप कमी कर्मचारी व बॉस असतात.

सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या व्हायरल होतेय. यात एका कर्मचाऱ्याने केलेल्या चांगल्या कामाचं बक्षिस म्हणून त्याची पगारवाढ करण्यात येते आणि प्रमोशनही होतं. पण, दुसऱ्याच दिवशी तो सुट्टीसाठी बॉसकडे विनंती करतो. बॉस आणि कर्मचाऱ्यामधील सुट्टीचं हे संभाषण सध्या व्हायरल झालंय.

Reddit या आघाडीच्या सोशल मीडिया फोरमवर सर्वप्रथम ही पोस्ट करण्यात आली. “एका मुलाला त्याने केलेल्या चांगल्या कामासाठी उत्तम पगारवाढ दिली आणि दुसऱ्याच दिवशी मला हा मेसेज मिळाला….अशाप्रकारे तुम्ही ब्रिटिश असल्याचं कळतं” अशा कॅप्शनसह ही पोस्ट शेअर झाली होती.

कर्मचारी आणि बॉसमधल्या व्हायरल स्क्रीनशॉटवरुन समजतं की, कर्मचारी सकाळीच सुट्टीची विचारणा करतोय. “गुड मॉर्निंग…क्षमस्व, पण मी आज सुट्टी घेऊ शकतो का? काल रात्री आनंद साजरा करण्यासाठी ड्रिंक घेतली आणि आता मी प्रचंड नशेत आहे…खूप हँगओव्हर असून अजून काही तास तरी नशा उतरेल असं दिसत नाही” असा मेसेज तो कर्मचारी आपल्या बॉसला करतो. त्यावर कर्मचाऱ्याने सांगितलेलं खरं कारण बघून बॉस खूश होतो, आणि “नक्कीच…तुला सुट्टी हवीये…आणि ज्या कारणासाठी तुला सुट्टी हवीये ते खूप मोठं कारण आहे….तू सुट्टीसाठी पूर्णपणे पात्र आहेस….” असा रिप्लाय देतो.

बॉसचा रिप्लाय बघून काही वेळातच ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून नेटकऱ्यांना कर्मचारी आणि त्याच्या बॉसमधलं संभाषण व नातं चांगलंच भावलंय. अनेकांनी सुट्टीसाठी हो म्हणणाऱ्या बॉसचं तोंडभरुन कौतुक केलंय. एका नेटकऱ्याने, “इमानदारीची प्रशंसा करणारे तुम्ही सर्वोत्तम बॉस आहात” असं म्हटलंय. तर, “आदर आणि विश्वास मिळविला जातो आणि जो बॉस त्याच्या कर्मचाऱ्यांचा आदर ठेवतो, त्याला कर्मचाऱ्यांकडून दहापट जास्त आदर मिळतो”, असं अन्य एका युजरने म्हटलंय. याशिवाय, “तुम्ही खूप चांगले बॉस दिसतात, अजून काही काम आहे का तुमच्याकडे” अशा मजेशीर प्रतिक्रियाही अनेक नेटकरी देत आहेत. बॉसने सुट्टीसाठी काहीही आक्षेप न घेतल्याचं बघून नेटकरी भलतेच खूश झालेत.