दिल्लीहून बंगळुरूला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बुधवारी एक सुखद घटना घडली. इंडिगोच्या विमानानं प्रवास करत असलेल्या एका महिला प्रवाशानं विमानात एका गोंडस बाळाला जन्म दिला. दरम्यान, इंडिगोन प्रशासनानंदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दिल्ली ते बंगळुरू जाणाऱ्या आमच्या ६ ई १२२ या विमानात बुधवारी संध्याकाळी ७.४० मिनिटांनी एका महिला प्रवाशानं बाळाला जन्म दिला. हे बाळ प्रिमॅच्युअर आहे. बाळ आणि त्याची आई दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. तसंच बाळाच्या जन्मादरम्यान विमानाचं उड्डाण सामान्य होतं. हे विमान संध्याकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी बंगळुरू विमानतळावर उतरलं. सर्वांनाच शुभेच्छा, असं इंडिगोकडून सांगण्यात आलं.

हवाईदलाचे माजी कॅप्टन क्रिस्तोफर यांनी बाळ आणि त्याच्या आईचे काही फोटो, तसंच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. बाळाचा जन्म बुधवारी संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांनी झाला. विमान संध्याकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी बंगळुरू विमानतळावर पोहोचलं. विमानतळावर इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी बाळाचं आणि त्याच्या आईचं जंगी स्वागत केलं आणि त्यांना शुभेच्छाही दिल्याचं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. नियमाप्रमाणे त्या बाळाला आयुष्यभरासाठी विमानानं मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येऊ शकते. अद्याप याबाबत मात्र कोणतीही माहिती देण्यात आली नाही.