सोशल मीडियामुळे कुठली गोष्ट लक्ष वेधून घेईल… चर्चेचा विषय ठरेल सांगता येत नाही. सोशल मीडियातून नेहमीच वेगवेगळ्या घटना ट्रेडिंगमध्ये येतात आणि त्यामागील कारणांचाही उहापोह होताना दिसतो. हे सांगण्याचं कारण म्हणजे श्वानासोबत रस्त्यावर झोपलेल्या एका मुलाचा फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हा फोटो उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये असलेल्या जनपदमधील आहे. एका व्यक्तीनं रस्त्यावर श्वानासोबत झोपलेल्या या मुलाचा फोटो घेतला. तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर मुझफ्फरपूरमधील जनपद प्रशासनाने याची दखल घेतली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्देश दिल्यानंतर जनपद पोलिसांनी मुलाचा शोध सुरू केला.

मुलगा सापडल्यानंतर त्यांची ह्रदयद्रावक कहाणी समोर आली. पोलिसांनी मुलाची चौकशी केली. त्यानंतर मुलाने रस्त्यावर झोपण्यामागील त्यांची दुःखद गोष्ट सांगितली. ती ऐकून पोलिसांचं मनही हेलावून गेलं. ९ ते १० वर्ष वय असलेल्या मुलाचं नाव अंकित आहे.

मुलाने पोलिसांना सांगितल्याप्रमाणे त्याचे वडील तुरूंगात आहेत, तर आई त्याला सोडून गेली आहे. या मुलाला कुटुंबाविषयी वा घराविषयी काहीही माहिती नाही. अंकित एका चहाच्या टपरीवर काम करतो. त्यावरच तो उदरनिर्वाह करतोय. त्याच्यासोबत असलेल्या श्वानाचं नाव डॅनी आहे.

मुझफ्फरपूरमध्ये सध्या कडाक्याची थंडी वाढली आहे. शहरातील शिव चौकातील एका दुकानासमोर हा मुलगा त्याचा मित्र बनलेल्या श्वानासोबत राहतो. त्याचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर जनपदचे पोलीस अधीक्षक अभिषेक यादव यांनी मुलाचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. या मुलाला आता महिला व बाल विकास विभागाकडे सोपवण्यात आलं आहे.