23 November 2017

News Flash

Viral : ‘त्या’ एका फोटोने मुलीचे आयुष्यच बदलले!

अखेर तिचे व्यसन सुटले

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 14, 2017 11:15 AM

बांधून ठेवण्यात आलेली मुलगी आणि तिच्या वडिलांबरोबर भाजीचा व्यवसाय करतानाचे तिचे छायाचित्र, छायासौजन्य - जीएमबी आकाश

फोटोग्राफर आपल्या आजूबाजूच्या घटना कायमच ‘वेगळ्या दृष्टीने’ टिपत असतात. असेच एका १० वर्षांच्या मुलीला बांधून ठेवल्याचे फोटो जीएमबी आकाश या बांग्लादेशी फोटोग्राफरने काढले. त्याने हे फोटो सोशल मीडियावर अपलोडही केले. त्याच्या या फोटोंची दखल घेऊन अनेकांनी या मुलीच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. आपल्या फोटोंमुळे काही घडेल असे आकाशच्या ध्यानीमनीही नव्हते. मात्र त्याच्या या फोटोंचा अतिशय सकारात्मक परिणाम झाला आणि या मुलीचे आयुष्यच बदलले. आकाशने टिपलेल्या या फोटोंमध्ये असे काय आहे? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

एका मुलीला तिच्या वडिलांनी घरात साखळीने बांधून ठेवले होते. आता त्यांनी असे का केले? याचे कारणही त्याने आपल्या पोस्टमध्ये दिले आहे. या मुलीला अमली पदार्थांचे व्यसन होते. आमची परिस्थिती अतिशय गरीब आहे. मी घरात नसताना या मुलीला काही झाले तर काय करणार? म्हणून तिला साखळीने बांधणे हा एकच पर्याय माझ्याकडे होता. मात्र विविध स्तरांतून मदतीचा ओघ सुरु झाल्यानंतर हा फोटोग्राफर पुन्हा मुलगी आणि तिच्या वडिलांपर्यंत पोहोचला. त्यावेळी या दोघांना काहीतरी एकत्रित काम द्यावे यावर चर्चा सुरु झाली. दोघेही भाजी विक्रीचा व्यवसाय करतील, असे ठरले. त्यानुसार वडिलांच्या कामात तीही आनंदाने मदत करू लागली.

भाजी विक्रीतून या दोघांना महिन्याला चार हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. तसेच या मुलीला घरात एकटीला राहावे लागत नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या योग्य वापराचा सकारात्मक परिणामही होतो, हेच या घटनेवरून लक्षात येते. मुलीच्या मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या व्यक्तींचे या फोटोग्राफरने फेसबुक पोस्टद्वारे आभार मानले आहेत. मुलीची व्यसनाच्या विळख्यातून सुटका झाल्याने आनंद झाला आहे, असेही त्याने म्हटले आहे.

First Published on September 14, 2017 11:15 am

Web Title: viral photo of father chained his daughter of gmb akash save from drugs netizens help for better life