करोनाच्या या कालावधीमध्ये सगळीकडे दिसणारी गोष्ट म्हणजे मास्क. मागील वर्षी तर एकाने चक्क सोन्याचा मास्क बनवल्याची बातमी समोर आली होती. मास्क आणि मास्कसंदर्भातील अनेक बातम्या मागील वर्षभरापासून समोर येत आहेत. करोना प्रादुर्भावाच्या कालावधीमध्ये मास्क हे अत्यावश्यक गोष्ट झालेली असतानाच मास्क वापरासंदर्भातील जनजागृतीही मोठ्याप्रमाणात केली जात आहे. मात्र सध्या सोशल नेटवर्किंगवर मास्क एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सोशल नेटवर्किंगवर सध्या एका लग्नातील फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमधील महिलेने लग्नात नटून थटून जाण्यासाठी चक्क मास्कवर नथ घालण्याचा जुगाड केलाय.

लग्नासाठी छान साडी आणि मेकअप करुन आलेल्या या महिचा फोटो व्हायरल होतोय. मात्र फोटो व्हायरल होण्यामागील कारण आहे तिचं मास्क आणि मास्क वर घातलेली नथ. करोनाच्या नियमांचं उल्लंघन न करता नथ घालायची असल्याने फोटोतील महिलेने नथ चक्क मास्कवर घातली आहे. त्यामुळे पांढऱ्या रंगाच्या मास्कवर ही सोनेरी नथ फारच उठून दिसत आहे. काहींनी या महिलेला सोशल नेटवर्किंगवर ट्रोल केलं आहे तर काहींनी तिचं कौतुक केलं आहे. लग्नामध्ये नथ घालण्याची हौस पूर्ण करताना या महिलेने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत मास्क न काढल्याबद्दल काहीजण तिचं कौतुक करत आहेत तर काहींनी एवढे कष्ट करुन नथ घालण्याची काय गरज होती असा प्रश्न विचारला आहे. काहींनी या महिलेने चक्क एन ९५ मास्कला नथ टोचल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.

ट्विटरवर आयपीएस अधिकारी अशणाऱ्या दिपांशू काबरा यांनी हा फोटो शेअर करत त्याला, “ज्वेलरी जुगाड” असं म्हटलं आहे. “ज्वेलरी जुगाडची ही सुपर अल्ट्रा प्रो मॅक्स लेव्हल आहे,” या कॅप्शनसहीत काबरा यांनी हा फोटो शेअऱ केलाय.

हा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला असून दोन हजारहून अधिक जणांनी हा फोटो लाईक केलाय.