स्पेनमधील कॅनरी बेटांवरील एक धक्कादायक प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या बेटांवरील समुद्र किनाऱ्यावर काही पर्यटक आरम करत असतानाच समुद्रकिनाऱ्याजवळ असणाऱ्या डोंगराचा मोठा कडा कोसळला. या सर्व प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला आहे. हा कडा कोसळला तेव्हा डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या रस्त्यावर काही गाड्या आणि लोकं उपस्थित असल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. दरड कोसळ्याचे पाहून पर्यटकांचा एकच गोंधळ उडाल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार हा प्रकार ला गोमेरा बेटावर घडला आहे. या ठिकाणी दरड कोसळू शकते आणि त्यामध्ये कॅम्पिंगसाठी बेटावर आलेले पर्यटक आडकू शकतात असा इशारा स्थानिक प्रशासनाने आधीच जारी केला होता. हाच दिलेला इशारा खरा ठरला. वेले ग्रान रे येथील लोकप्रिय रिसॉर्टमधील अनेक पर्यटकांनी अरगागा समुद्रकिनाऱ्याजवळील डोंगराचा कडा समुद्रात कोसळताना पाहिला. कॅनरी बेटांचे अध्यक्ष एंजल व्हिक्टर टॉरेस यांनी हा घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी लोकांना दरड असलेल्या समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. “धोकादायक आणि प्रवेश बंदी असणारा हा भाग आहे. हा भाग वरवर शांत वाटत असला तरी या डोंगरांमध्ये मोठ्या भेगा असल्याने असा प्रकार होणार पुन्हा होण्याची शक्यता आहे,” असं टॉरेस यांनी म्हटलं आहे.

या व्हिडिओमध्ये डोंगर कडा तुटून थेट समुद्रामध्ये पडल्याचे दिसत आहे. डोंगराचा मोठा भाग पडल्यानंतर सगळीकडे धूळ पसरल्याचेही दिसत आहे. व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीपासून थोड्या अंतरावर हा अपघात घडल्याने मोठा भाग पडल्यानंतर ही व्यक्ती रिसॉर्टच्या आतील भागामध्ये पळताना दिसते. कॅरियन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार दोन हेलिकॉप्टर, स्थानिक पोलीस, वैले ग्रैन अग्निशामन दल, नागरिक सुरक्षा आणि संरक्षण दलाचे जवान या दुर्घटनेनंतर मदतकार्य करत आहेत. या दुर्घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र यासंदर्भात कोणताही ठोस आकडेवारी देण्यात आलेली नसून बचाव दलाकडून ढिगाऱ्यात कोणी अडलं आहे का याचा शोध घेतला जात आहे.