राफेलच्या मुद्द्यावरून सध्या भाजपा आणि काँग्रेस आमने-सामने आहेत. संसदेतही या मुद्द्यावर सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वाद सुरु आहेत. या वादात आता एका चिमुरडीने उडी घेतली आहे. आठ वर्षांच्या मुलीने राफेलबाबत राहुल गांधींना उद्देशून एक व्हिडिओ केला आहे. यामध्ये राफेल विमानाचा फरक तिने एका पेन्सिल बॉक्सच्या मदतीने समजावून सांगितला. एका ८ वर्षाच्या मुलीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून राफेल कराराच्या मुद्यावरून भााजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वारंवार टीका केली जात आहे. या व्हिडिओमध्ये त्या आठ वर्षाच्या मुलीने कंपास पेटीचे उदाहरण देत राफेल प्रकरण समजावले आहे. ‘मी राफेल प्रकरण सोप्या पद्धतीने समजावू इच्छिते. कंपासाची जी रिकामी बाजू आहे ती राहुल गांधी यांची आणि त्याची किंमत ७२० कोटी इतकी आहे. दुसरी बाजू नरेंद्र मोदी यांची आहे आणि ती अत्याधुनिक शस्त्रास्त्र्यांनी भरली आहे. त्याची किंमत १६०० कोटी इतकी आहे. राहुल गांधी यांना हे समजत नाही की, ते ज्या विमानाच्या किमतीसंदर्भात बोलत आहे ते केवळ रिकाम्या विमानाची किंमत आहे आणि मोदी शस्त्रासहित विमानाच्या किंमतीसंदर्भात बोलत आहेत.’

दरम्यान, देशाच्या सरंक्षण मंत्री निर्मला सितारमन यांनी हा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ आणखीनच चर्चेत आला. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ”हा व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद. मी या लहान मुलीचे विशेष धन्यवाद करते, की तिने राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी प्रकरणात रुची दाखवली. माझ्या शुभेच्छा आहेत, की ती लढाऊ विमानाची एक प्रशिक्षित वैमानिक बनावी”.