क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ आहे असं सांगितलं जातं. मात्र अनेकदा या खेळामध्ये मैदानावरच अशा काही गोष्टी घडतात की त्यामुळे खरोखर हा सभ्य लोकांचा खेळ आहे का असा प्रश्न पडतो. असाच काहीसा प्रकार पाकिस्तानी नागरिकांनी आयोजित केलेल्या एका चॅरिटी सामन्यामध्ये घडला. या सामान्यामध्ये दोन खेळाडू एकमेकांशी भांडू लागले आणि हे भांडण इतक्या टोकाला गेलं की त्यांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे प्रकरण एवढं वाढलं की हा सामनाच रद्द करावा लागला. मैदानातील वाद आणि गोंधळ वाढत असल्याचं पाहून प्रेक्षक म्हणून आलेल्या काही महिला वाद सोडवण्यासाठी मैदानात गेल्याचं चित्र दिसलं. लाथा बुक्क्यांनी हाणामारी सुरु असतानाच महिलांनी मध्ये पडून हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोंधळाचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय.

ही घटना रविवारी इंग्लंडमधील मेडस्टोनमधील मोंटे पार्क क्रिकेट क्लबमधील सामन्यात घडतील. ही सर्व घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या व्हिडीओमध्ये काही खेळाडू मैदानातच घोळका करुन एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. हा वाद सुरु असतानाच एकजण बॅट घेऊन आला आणि विरोधकांना मारु लागला त्यानंतर येथे आणखीन गोंधळ झाला.

करोना संकटाच्या काळामध्ये आर्थिक परिस्थिती चिंताजनक असणाऱ्या गरजूंना मदत करण्यासाठी निधी उभारण्याच्या हेतूने या चॅरिटी क्रिकेट सामन्याचं आय़ोजन करण्यात आलं होतं. एका चांगल्या हेतूने या सामन्याचं आयोजन करण्यात आल्याने अनेकजण सहकुटुंब हा सामना पाहण्यासाठी आले होते. केंट ऑनलाइनने दिलेल्या वृत्तानुसार शेअर फॉर केअर म्हणजेच समाजाच्या काळजीसाठी तुमच्याकडील काही वाटा गरजूंसोबत शेअर करा या हेतूने सामना आयोजित करण्यात आलेला. पाकिस्तानमधील गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी हा सामना खेळवण्यात आलेला. खास करुन आरोग्यविषयक आर्थिक मदतीची गरज असणाऱ्यांना या सामन्याच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून मदत केली जाणार होती. मात्र गरजूंना मदत करण्याऐवजी मैदानामध्ये सामन्यासाठी जमलेले खेळाडूच एकमेकांना बॅटींनी मारहाण करतानाचं चित्र दिसलं.

मैदानात एकाच वेळी दोन वेगवेगळ्या गटांमध्ये मारहाण सुरु होती. एका ठिकाणी तर एका व्यक्तीला घेरुन सर्वजण उभे होते आणि त्या घोळक्यात साडपलेल्या विरोधी संघाच्या खेळाडूला लाथा बुक्क्यांनी तसेच बॅटने मारत होते.

या सर्व प्रकारामध्ये काही खेळाडू किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही हणामारी नक्की कशावरुन सुरु झाली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.