जंगली प्राणी आणि माणूस यांच्यात एकप्रकारचा बाँड असतो हे आपल्याला माहित आहे. पण त्याचा अनुभव आपल्याला फारसा येत नाही. मात्र नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे या दोघांमधील अनोखे नाते पुन्हा एकदा समोर आले आहे. एका हत्तीच्या पिल्लाला व्यक्ती पाण्यात बुडत असल्याचे वाटले आणि त्याने त्या माणसाला पाण्यात बुडताना वाचवले आहे. मुख्य म्हणजे हा व्यक्ती पाण्यात बुडत असल्याचे वाटून हत्तीचे पिल्लू धावत पाण्यात गेले आणि त्या व्यक्तीचा जीव वाचवला. त्यामुळे प्राण्यांनाही भावना असतात हे पुन्हा एकदा आपल्या समोर आले आहे. हत्तींचा कळप नदीच्या किनारी फिरत होता. तेव्हा हत्तीच्या एका पिल्लाला डेरिक पाण्यात बुडत आहे असे वाटले. मग हे पिल्लू धावतच पाण्यात गेले आणि डेरिक याला पाण्याबाहेर काढण्यासाठी हालचाल केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष म्हणजे ही घटना कॅमेरात कैद झाली असून सोशल मीडियावर त्याचा व्हिडियो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अॅनिमल लँड या फेसबुक पेजने आपल्या पेजवरुन हा व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोला अनेकांनी लाईक केले असून बऱ्याच जणांनी त्यावर कमेंटही केली आहे. हत्तीच्या या क्युटनेसचे खूप कौतुक होताना दिसत आहे. ही घटना थायलंडमधील हत्तींच्या पार्कमध्ये घडली असून याठिकाणी बरेच हत्ती एकत्रित राहतात. डेरीक हा त्यांची काळजी घेणारा व्यक्ती असल्याचे समजते.

प्रत्यक्षात डेरिक अतिशय सराईतपणे पोहत असल्याचे व्हिडियोमध्ये दिसत आहे. मात्र हत्तीला किनाऱ्यावरुन तो बुडत असल्याचे वाटले. त्यामुळे हा हत्ती बऱ्याच पाण्यातून कशीबशी वाट काढत डेरीकपर्यंत पोहोचला. त्यानंतर त्याने डेरिकला नदीच्या किनाऱ्यावर नेले. डेरिकपर्यंत पोहोचल्यावर हत्तीने त्याला जवळपास कवटाळूनच घेतले. आपले पाय आणि सोंड यांच्यामध्ये तो कसा सुरक्षित राहील याची काळजी हे हत्तीचे पिल्लू घेत होते. मग किनाऱ्यावर आल्यावर दोघांनीही एकमेकांना आनंदाने मिठी मारली आणि त्यांच्यातील अनोखे नाते दिसून आले. त्यामुळे जंगली आणि अवाढव्य दिसणाऱ्या प्राण्यांनाही भावना असतात आणि आपले प्रेम ते वेळोवेळी व्यक्तही करतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video baby elephant rescues a man she mistakenly believed that he was in danger
First published on: 26-09-2018 at 12:08 IST