राज्यात अतिवृष्टीने गुरुवारपासून हाहाकार माजवला आहे. चिपळूण, महाडला पुराने वेढले असून, त्यात शेकडो नागरिक अडकले आहेत. उल्हास नदीच्या पुरामुळे बदलापूरसह कल्याण तालुक्यातील अनेक गावे जलमय झाली. कोल्हापूरसह पश्चिाम महाराष्ट्रातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका चिपळूणला बसलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी रात्रभर पडलेला पाऊस, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग आणि समुद्राला आलेली भरती, अशा तीन घटना एकाच कालावधीत घडल्यामुळे गुरुवारी चिपळूण शहर शब्दश: जलमय झाले. चिपळूण मुख्य बाजारपेठेत सकाळी ११ वाजता १० फूट पाणी होते. शहरातील बहुसंख्य इमारतींचे तळमजले पाण्यात बुडाले असून, काही ठिकाणी पहिल्या मजल्यांवरील घरांमध्येही तीन ते चार फूट पाणी भरले. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले. सुमारे १६ वर्षांपूर्वी, २६ जुलै २००५ घ्या महापुरापेक्षाही निसर्गाचा मोठा प्रकोप चिपळूणकर अनुभवत असून शहरातील बहुसंख्य इमारतींचे तळमजले पाण्यात बुडाले आहेत. काही ठिकाणी तर पहिल्या मजल्यावरही घरांमध्ये तीन ते चार फूट पाणी भरले आहे. अशातच चिपळूणमधील पूर परिस्थितीची दाहकता दाखवणारे काही व्हिडीओ आणि फोटो समोर येत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये काही फूट पाणी साचलेल्या इमारतीखाली एका व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच तोल गेल्याने ती व्यक्ती दोन मजली इमारतीच्या गच्चीजवळून खाली साचलेल्या पाण्यात पडताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एका इमारतीच्या गच्चीवरुन काहीजण हवेने भरलेल्या टायर ट्यूब आणि रस्सीच्या मदतीने खाली पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या टायरला पकडून ही व्यक्ती दोन मजले वरपर्यंत जाते. गच्चीवरील लोक टायरला बांधलेल्या दोरीच्या मदतीने तिला वर घेत असतात. मात्र अगदी वर पोहचल्यानंतर गच्चीवरील लोक टायर हातात घेऊन या व्यक्तीला वर खेचण्याचा प्रयत्न करत असतानाच या व्यक्तीचा हात सुटतो आणि ती थेट दोन मजल्याच्या उंचीवरुन खाली पुराच्या पाण्यामध्ये पडते. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे, नंतर या महिलेला वाचवण्यात आलं की नाही यासंदर्भातील काही महिती लगेच समोर आली नव्हती. मात्र हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाल्याचं दिसत आहे.

हा व्हिडीओ चिपळूणचा आहे असा दावा केला जात आहे मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.

एनडीआरएफच्या तुकड्या संध्याकाळी चिपळुणात पोचल्या आहेत. घरांमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरचीही मदत घेतली जात आहे. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत तालुक्यात तब्बल २०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने शहरातील अनेक भागात पाणी साचले असून अंतर्गत मार्ग बंद झाले आहेत. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत तालुक्यात तब्बल २०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने शहरातील अनेक भागात पाणी साचले असून अंतर्गत मार्ग बंद झाले आहेत. चिपळूणमध्ये दोन महिला पाण्यात बुडाल्या. त्यातील एकीचा मृत्यू झाला असून, दुसरी महिला पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. पुराच्या पाण्यात असंख्य दुचाकी-चारचाकी गाड्या वाहून गेल्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video chiplun floods terrifying video of woman falling from building during rescue scsg
First published on: 23-07-2021 at 14:58 IST