रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण देशात चिंताजनक बनले आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर असताना तेलंगाणातील एका रिक्षामध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशी कोंबण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ करिमनगरच्या पोलीस आयुक्तांनीही आपल्या ट्विटर हँडलवरुन पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना आयुक्तांनी म्हटले आहे की, लोकांनी आपल्या स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. ही व्हायरल झालेली क्लीप ९ हजार पेक्षाही अधिक लोकांनी पाहिली आहे.

यामध्ये प्रमाणापेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका रिक्षा ड्रायव्हरला पोलीस थांबवतात. तसेच इतके प्रवासी रिक्षात कसे भरले याबाबत त्या ड्रायव्हरकडे विचारणा करतात. त्यानंतर प्रवाशी या रिक्षातून खाली उतरताना या व्हिडिओत दिसत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे एकामागून एक असे २४ प्रवाशी या रिक्षातून बाहेर येतात. त्यानंतर पोलीस त्यांना फोटो घेण्यासाठी उभे राहण्यास सांगतात.

गेल्या आठवड्यात तेलंगणाच्या मेहबुबनगर जिल्ह्यात अशाच प्रकारे प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी भरलेल्या एका रिक्षाला महामार्गावर ट्रकने धडक दिली होती. या धडकेत १२ कामगारांचा मृत्यू झाला होता तर ६ जण गंभीर जखमी झाले होते.

राज्यसभेत रस्ता सुरक्षेबाबतचे मोटर व्हेईकल विधेयक मंजूर झाल्यानंतर काही दिवसांनी हा व्हिडिओ समोर आला आहे. या विधेयकामध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक नियम बनवण्यात आले असून दंडाची रक्कमही वाढवण्यात आली आहे.