पॅकेटमधील पदार्थ काढून खातानाचा डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गेल्यावर्षी ऑनलाइन फूड ऑर्डर कंपनी झोमॅटोवर अनेकांनी टीका केली होती. आता झोमॅटोचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण झोमॅटोचे कौतुक करत आहे. झोमॅटोने पहिल्यांदा एका दिव्यांग मुलाला आपल्या कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम दिलं आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये लाल टी-शर्टमध्ये मुलगा दिसत आहे. हा मुलगा दिव्यांग असल्याने दिव्यांगासाठी असलेल्या खास सायकलमध्ये बसून तो फुड डिलिव्हरी करत आहे. हनी गोयल नावाच्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना हनी गोयलनं कॅप्शनही दिलं आहे. त्यामध्ये तो म्हणतो, ‘असेच काम करत राहा, झोमॅटो हे पाहून मला चांगलं वाटलं, हा व्हिडीओ पाहून दिव्यांग मुलांच्या अपेक्षा नक्कीच वाढतील’ हनीच्या पोस्टला अनेकांनी रिट्विट आणि शेअर करत झोमॅटोवर कौतुकाची थाप टाकली आहे.

दिव्यांगासाठी कमी ठिकाणी कामं असतात त्यामुळे त्यांना रोजगार मिळणे कठीण जाते. पण झोमॅटोने एका दिव्यांग मुलाला काम देऊन आत्मविश्वास वाढवला आहे. दिव्यांगांनी कोणावरही अवलंबून राहू नये हे यामागचे प्रमुख कारण आहे.