आंबा म्हणजे फळांचा राजा. मात्र या आंब्यालाही करोनाचा जबरदस्त फटका बसला आहे. ऐन आंबाविक्रीची मौसम सुरु झाल्यापासून म्हणजेच मार्चच्या शेवटापासून ते अगदी मे अर्धा संपत आला तरी लॉकडाउन सुरु असल्याने आंबा उद्योजकांना मोठा फटका बसला आहे. आंबाप्रेमींसाठीही यंदाचा मौसम हा निराशाजनक ठरला. अनेकांना मे अर्धा संपत आला असूनही आंब्याची चव चाखता आलेली नाही. काही ठिकाणी फळं झाडावरच आहेत तर काही ठिकाणी काढलेली फळं ग्राहकांपर्यंत पोहचवताना अडचणी येत आहे. मात्र झाडावरच फळं असण्याचा फायदा प्राण्यांचा झाल्याचे चित्र दिसत आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये चक्क एक हत्ती आपल्या सोंडेने आंब्याचे झाड हलवून आंबे पाडून त्यांचा आस्वाद घेताना दिसत आहे.

भारतीय वन सेवा विभाग म्हणजेच इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये अधिकारी असणाऱ्या सुशांत नंदा यांनी ट्विटवरुन आंबे पाडणाऱ्या हत्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या १८ सेंकदाच्या व्हिडिओमध्ये एक हत्ती सोंडेने आंब्याच्या झाडाची फांदी जोरात हलवताना दिसतो. त्यानंतर आंबे जमीनीवर पडल्यावर सोंडेने हा हत्ती आंबे उचलून त्यांचा आस्वाद घेताना दिसत आहे. “सध्या आंब्यांचा मौसम आहे. अशावेळेस या मोठ्या प्राण्याला फळांच्या राजाची चव चाखण्यापासून कसं रोखता येईल. गोड गोड आंबा खाण्यासाठी हा हत्ती झाड हलवून आंबे पाडताना दिसत आहे,” अशी कॅप्शन नंदा यांनी या व्हिडिओला दिली आहे.

हत्ती हा सर्वात हुशार प्राण्यांपैकी एक आहे. व्हिडिओमधील हत्तीची हीच हुशारी साडेसहा हजारहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. हत्ती हा सर्वात मोठा मेंदू असणारा प्राणी आहे. त्याच्या मेंदूमध्ये ३०० बिलीयन न्युरॉन्स असतात. हा आकडा मानवाच्या मेंदूतील न्युरॉन्सपेक्षा तिप्पट आहे.