X

Viral Video : हत्तीला स्मोकिंग करताना पाहीलंय?

जाणून घ्या व्हिडिओमागील सत्य

स्मोकिंग करणे आरोग्यासाठी घातक असते, त्यामुळे ते टाळावे असे आपण अनेकदा ऐकतो. आता माणसाला असलेले व्यसन एकवेळ आपण समजू शकतो. पण थेट हत्तीच स्मोकिंग करायला लागला तर? अशाप्रकारचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटीकडून यु-ट्यूबवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये हत्ती स्मोकिंग करत असल्याचे भासत आहे. नेटीझन्समध्ये हा व्हिडिओ भलताच व्हायरल झाला असून अनेकांनी तो पाहून शेअरही केला आहे.

जंगलात असलेला हा हत्ती आपल्या तोंडातून धूर सोडत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ४९ मिनीटांच्या या व्हिडिओत हत्ती सोंडेने खालचे काहीतरी उचलून तोंडात घालतो आणि सोंड बाहेर काढताना त्यातून धूर येत असल्याचे दिसते. असे या संपूर्ण व्हिडिओमध्ये साधारण ३ ते ४ वेळा होताना दिसते. हा व्हिडिओ कर्नाटकमधील नागरहोल राष्ट्रीय उद्यानातील असून विनय कुमार या वनाधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ काढला आहे. एकदा जंगलातून जात असताना त्यांना हा प्रसंग दिसला आणि त्यांनी तो आपल्या कॅमेरात कैद केला आहे.

हत्तीने अशाप्रकारे धूर कसा काढला याबाबत तज्ज्ञ अनेक गोष्टी पडताळून पाहत आहेत. त्यावेळी जंगलातील राख हत्ती तोंडात घेत असून स्मोकिंग केल्याप्रमाणे तो ती राख हवेत उडवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कोळशात कोणतेही पौष्टीक मूल्य नसते, मात्र त्यामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे अनेकदा प्राणी त्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे जंगलात लागलेली आग किंवा ज्वाळा यानंतर तयार झालेली राख प्राणी वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरताना दिसतात असेही त्यांनी सांगितले.