सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका जिराफचा आहे. हे जिराफ एका गाडीच्या खिडकीमधून आपली मान आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याच वेळी असं काही घडलं की सर्वांना आश्चर्याचा धक्कादच बसला. इंग्लंडमधील वूस्टरशायर येथील वेस्ट मिडलॅण्ड सफारी पार्कमध्ये एक जोडपं फिरत होतं. त्यांनी पार्कमधील रस्त्याच्या बाजूला आफली गाडी उभी केली. तेवढ्यात त्यांच्या गाडीजवळ एक जिराफ आलं. गाडीमधील चालकाच्या सीटच्या बाजूच्या सीटजवळची खिडकी उघडीच होती. या जागी एक महिला बसली होती. खिडकी उघडी असल्याचे पाहून जिराफने आपली मान या खिडकीमधून आत टाकली. अचानक जिराफने आपलं तोंड आतमध्ये टाकल्याने ती महिला घाबरली. तिने तातडीने काच वर करुन खिडकी बंद करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जिराफची मान काच आणि खिडकीच्या फ्रेममध्ये अडकली.

खिडकीची काच वर जात असल्याने जिराफने स्वत:चं तोंड बाहेर काढण्यासाठी जोरात मानेला झटका दिला अन् खिडकीची काच तुटली. खिडकीच्या काचेचे अगदी बारी तुकडे झाले. मात्र सुदैवाने या प्रकारामध्ये जिराफ जखमी झाले नाही. तसेच गाडीमधील कोणत्याही व्यक्तीला इजा झाली नाही. हा संपूर्ण प्रकार एका दुसऱ्या पर्यटकाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. खरं तर या घटनेमध्ये जिराफची काहीच चूक नव्हती. सफारीमध्ये फिरताना काही नियमांचे पालन करणे पर्यटकांना बंधनकारक असते. जंगलामध्ये गाडीखाली उतरु नये, खिडकीच्या काचा संपूर्ण उघड्या ठेऊ नये असे काही सामान्य नियमांचे पालन पर्यटकांनी करणं अपेक्षित असतं. मात्र या पर्यकांनी नियमांचे पलन केलं नाही आणि जिराफची मान खिडकीच्या काचेत अडकली. नियमांचे उल्लंघन करत खिडकीची काच पूर्ण उघडी ठेवल्याने जिराफने आत मान घातली आणि हा सारा प्रकार घडला.

हा व्हिडीओ बराच जुना असला तरी सोशल नेटवर्किंगवर काही अकाऊंटवरुन तो नव्याने शेअर करण्यात आल्याने पुन्हा चर्चेत आला आहे.