करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतामध्ये २५ मार्चपासून लॉकडाउन सुरु आहे. या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा, मॉल, हॉटेल बंद ठेवण्यात आले आहेत. गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन सरकारी यंत्रणांमार्फत करण्यात आलं आहे. अर्थात याला आता दिड महिन्याहून अधिक काळा झाला आहे. अनेकजण घरीच बसून कंटाळले आहेत. आरोग्य तज्ज्ञही मानसिक ताण वाढण्याची शक्यता असल्याचे सांगताना दिसत आहेत. मात्र या लॉकडाउनच्या काळामध्ये अनेकांनी इंटरनेटचा आधार घेतला आहे. चित्रपट असो, सोशल नेटवर्किंग असो अनेकजण इंटरनेटच्या माध्यमातून आपले मनोरंजन करुन घेत आहेत, करोनाविरुद्ध लढण्यात उतरलेल्यांचे कौतुक करत आहेत. याच कालावधीमध्ये अनेक व्हायर व्हिडिओची चर्चा होताना दिसत आहे. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे तो म्हणजे जम्मू काश्मीरमधील एका पोलीस अधिकाऱ्याचा.

जम्मू काश्मीरमधील जम्मू तावी रेल्वे स्थानकाच्याबाहेर एक पोलीस अधिकारी तोंडावर मास्क अन् गळ्यामध्ये गिटार अडकवून ‘गुलाबी आंखें’ गाणं गाताना दिसत आहे. केंद्र सरकारने मागील काही दिवसांपासून देशामधील वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेल्या स्थलांतरित कामागारांना त्यांच्या राज्यात जाता यावे म्हणून विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशाच प्रवाशांना या अधिकाऱ्याने संगीतमय निरोप देण्यासाठी थेट गिटार वाजवत गाणं म्हटलं. जम्मू काश्मीर पोलीस खात्यात काम करणाऱ्या मुकेश सिंग यांनीच हा व्हिडिओ ट्विटवरुन शेअर केला आहे.

“पूर्व जम्मूचे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याने जम्मू रेल्वे स्थानकातून राज्याबाहेर जाणाऱ्या विशेष ट्रेनममधील प्रवाशांना निरोप देण्यासाठी अशाप्रकारे गाणं गायलं,” अशी कॅप्शन सिंग यांनी हा व्हिडिओ शेअर करताना दिली आहे.

या व्हिडिओला १५ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.