भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची लाडली कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. तिचे वेगवेगळ्या अंदाजातील व्हिडीयो कायमच नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतात. कधी ती पोळ्या लाटत असते, कधी मल्याळम भाषेत गाणे गाते, तर कधी लाडक्या बाबाला आपल्या बोबड्या बोलात मॅचसाठी शुभेच्छा देत असते. कॅप्टन कूलसोबतचा झिवाचा असाच आणखी एक व्हिडियो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडियो नेटीझन्सचे लक्ष वेधून घेत आहे. चेन्नई सुपरकिंग्जच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर हा व्हिडियो अपलोड करण्यात आला आहे. त्यानंतर अवघ्या काही क्षणात हा व्हिडियो मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअरही करण्यात आला.

यामध्ये कॅप्टन मुलीसोबत मजा करत असल्याचे म्हटले आहे. धोनीही आपल्या या लाडलीसमोर अक्षरश: शरण गेल्याचे दिसत आहे. मैदानात खाली बसलेल्या धोनीच्या डोक्यावरील टोपीशी झिवा खेळते. तेव्हा तोही तिच्याकडे अतिशय प्रेमळ भावनेने बघत असल्याचे आणि तिच्या चेहऱ्यावरील आनंद न्याहाळत असल्याचे दिसते. नंतर झिवाही आनंदाने उड्या मारतानाही दिसते. चेन्नई सुपरकिंग्ज टॉप चार संघात पोहोचले असून आता त्यांची नजर अंतिम सामन्यावर आहे.