करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउननंतर टप्प्या टप्प्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अनेक राज्यांमध्ये केंद्र सरकारच्या सुचनांच्या निर्देशानुसार वेगवेगळ्या सेवा सुरु करण्यासाठी परवाणगी देण्यात आली आहे. करोनासंदर्भातील नियमांचे पालन करुन अनेक राज्यांनी मार्गदर्शक तत्वं जारी केली असून त्यानुसार सेवा सुरु कराव्यात असं म्हटलं आहे. मात्र अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन केलं जात आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे. चेन्नईमधील साड्यांच्या दुकानातील गर्दीचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अरुण बोथरा यांनी ट्विटरवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. “चेन्नईमधील साडीचे दुकान. करोनाला येथे प्रवेश करता येणार नाही कारण जागाच नाहीय. तुम्हीही पाहू शकता,” अशी कॅप्शन अरुण यांनी या व्हिडीओला दिली आहे. काही तासांमध्ये हा व्हिडीओ एक हजारहून अधिक जणांनी रिट्विट केला असून सहा हजारहून अधिक जणांनी तो लाईक केला आहे.

या व्हिडीओ खाली अनेकांनी मजेदार कमेंटही दिल्या आहेत. पाहूयात अशाच काही कमेंट्स

१) दुकानाचा मालक

२) १०० टक्के सूट आहे का?

३) काही तरी खास असणार

४) करोनाच गोंधळात पडला

५) हे असं दिल्लीमध्येही झालं आहे

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची दखल घेत दुकानावर कारवाई करत ते सील केलं आहे. यासंदर्भातील माहिती चेन्नईमधील आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांनीच ट्विटरवरुन दिली आहे. दुकानाला टाळं ठोकून सील केल्याचा फोटोही पोस्ट करण्यात आला आहे.

यासंदर्भात चेन्नई महानगरपालिकेनेही ट्विटरवरुन माहिती दिल्याचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल होताना दिसत आहेत.

दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेनेही कुमारन सिल्क असं या दुकानाचे नाव आहे असं म्हटलं आहे. माहापालिकेने या दुकानावर कारवाई केली आहे असंही एएनआयने म्हटलं आहे.

सामान्यपणे व्हिडीओ व्हायरल झाल्यावर दुकानदारांचा फायदा होतो इथे मात्र उलट चित्र दिसत आहे असंही काहींनी म्हटलं आहे.