मुंबईतील एका उंच इमारतीच्या कठड्यावर जीवघेणा स्टंट करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओची मुंबई पोलिसांनी दखल घेतली असून तरुणाचा शोध घेतला जात आहे. तरुणासोबत हा स्टंट मोबाइलवर रेकॉर्ड करणाऱ्या इतर दोन तरुणांचाही पोलीस शोध घेत आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर बुधवारपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडीओत तरुण इमारतीच्या २२ व्या मजल्यावरील कठड्यावर बसून एनर्जी ड्रिंक पिताना दिसत आहे. यानंतर तो तेथील अरुंद ठिकाणी उभं राहून हॅण्डस्टँड करताना दिसत आहे. तो हे सर्व करत असताना त्याचे इतर दोन मित्र मोबाइलवर हा स्टंट रेकॉर्ड करत होते. यामधील एकजण मोबाइलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करताना दिसतही आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरु केला आहे. कांदिवली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रवी अदाने यांनी ज्या इमारतीवर हा स्टंट करण्यात आला तिची ओळख पटली असल्याची माहिती एनडीटीव्हीशी बोलताना दिली आहे. जय भारत असं या इमारतीचं नाव असून तरुणांचीही ओळख पटली असून सध्या ते बेपत्ता आहेत.