पाकिस्तानमध्ये एका वृत्तवाहिनीवर लाइव्ह चर्चेदरम्यान नेत्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याने पत्रकाराला बेदम बेदम मारले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्याकडून झालेल्या या प्रकारावर पाकिस्तानात चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.

पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीवरील ‘न्यूज लाइन विथ अफताब मुघेरी’ या शोमध्ये हाणामारी झाली आहे. या कार्यक्रमांमध्ये चर्चेसाठी पीटीआय पक्षाचे नेते मसरूर अली सियाल आणि कराची प्रेस क्लबचे प्रमुख इम्तियाज खान सहभागी झाले होते. यावेळी चर्चेदरम्यान नेत्यांमध्ये आणि पत्रकारांमध्ये शाब्दिक चकमक झाली. हा वाद इतक्या विकोपाला गेला की काही क्षणांमध्ये स्टुडिओचं आखाड्यात रुपांतर झालं. या नेत्याने पत्रकाराला जोरदार चोप दिला. पत्रकराला धक्का देऊन जमिनीवर पाडलं आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी स्टुडिओमध्ये असलेल्या लोकांनी ही हाणामारी सुरू असताना काही काळ बघ्याची भूमिका घेतली. मात्र नंतर त्यांनी या दोघांचं भांडण सोडवलं.

पीटीआय पक्षाचे नेते मसुर अली यांनी कराची प्रेसक्लब अध्यक्ष इम्तियाज खान यांना लाईव्ह कार्यक्रमात मारहाण केली. हा नवा पाकिस्तान आहे का?” असं मतं पाकिस्तानमधील मुक्त पत्रकार नालया इनायत यांनी व्यक्त केलं आहे.

लाइव्ह शोमध्येच ही हाणामारी झाल्याने या हाणामारीवर पाकिस्तानमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.