विमानतळावरील सुरक्षा नियमांचे उल्लंघन झालेला एका व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे डायरेक्टरेट जनरल ऑफ सिविल एविएशन’ (डीजीसीए) च्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. विमानतळावर मॉडेल्स काही पोज देत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत असून याचदरम्यान त्यांच्या डोक्यावरुन विमानाने उड्डाण केल्याचे कॅमेरात कैद झाले आहे.

यामध्ये ९ मॉडेल्स उभ्या असून त्यांच्या डोक्यावरुन ९ सिटसचे एक खाजगी विमान उड्डाण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ कधी आणि कशापद्धतीने काढला गेला याबाबत चौकशी सुरु असून त्याबाबत अद्याप पुरेशी माहिती मिळालेली नाही. विमानतळावर उभ्या असलेल्या या मॉडेल्स आपल्या डोक्यावरुन विमान जात असताना काहीशा खाली वाकतात आणि एकच जल्लोष करत असल्याचेही दिसत आहे.

हा व्हिडिओ नेमका कुठे चित्रित झाला आहे याबाबतही चर्चा सुरु असून राजस्थान किंवा दिल्ली या दोन ठिकाणांची नावे प्रामुख्याने पुढे येत आहेत. एएनआय या न्यूज एजन्सीने नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडिओनुसार विमानतळावर सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

सेल्फी आणि फोटो काढताना अपघात घडल्याच्या घटना ताज्या असतानाच या मॉडेलचे अशाप्रकारे वागणे कितपत योग्य आहे? आणि या सगळ्यावर कोणाचा वचक असणार की नाही असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण हाही प्रश्न अनुत्तरीतच आहे.