करोना संकटाचा सामना करणाऱ्या अमेरिकेमध्ये आणखीन एक नैसर्गिक संकट आलं आहे. येथील कॅलिफोर्नियामधील जंगलांमध्ये वणवा पसरला आहे. जंगलामध्ये भीषण आग लागलेली असतानाच वादळ आल्याने फायर टॉरनॅडो दिसलं असून हे वादळ कॅमेरामध्ये कैद झालं आहे. आगीच्या पिवळ्या रंगाच्या ज्वालांमुळे वादळ हे आगीचे वादळ असल्याचा भास होतो त्यामुळेच वणवा लागलेल्या ठिकाणी येणाऱ्या वादळांना फायर टॉरनॅडो असं म्हणतात. या फायर टॉरनॅडोचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

कॅलिफोर्नियातील लॉयल्टन परिसरामधील जंगलांना आग लागली. त्यावेळी येथील हवेचा दाब कमी झाल्याने या परिसरामध्ये वादळाचा इशारा देण्यात आला होता. या वादळामध्ये आग पसरवण्याची क्षमता असल्याचेही सांगण्यात आलं होतं. आगीतील उष्णता आणि धूर वादळामध्ये खेचले जातात. आग, धूर आणि वादळ या तिघांपासून पिवळ्या रंगाचे फायर टोर्नेडो तयार होते. या वादळाचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर आता २०२० मध्ये केवळ परग्रहावसीय पहायचे राहिलेत अशा कमेंट अनेकांनी केल्या आहेत. युएस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार उत्तर कॅलिफोर्नियामधील जंगलांमध्ये लागलेल्या आगीमुळे हे फायर टोर्नेडो निर्माण झाले. वरिष्ठ हवामान तज्ज्ञ डॉन जॉनसन यांनी अशा वादळांना फायरनेडो असंही म्हणतात अशी माहिती दिली. “अगदी विचित्र हवामानामध्ये अशाप्रकारच्या वादळाची निर्मिती होते. हे वादळ आगीचं वादळं असतं असं म्हणता येईल. या वादळाच्या मार्गात येणारी प्रत्येक वस्तू खाक होते. या वादळाची नुकसान पोहचवण्याची क्षमता ही साध्या वादळापेक्षा अधिक असते,” असं जॉनसन म्हणाले. अग्निशामन दलालाही या वादळाचा समान करणं अवघड जातं असंही जॉनसन यांनी सांगितलं.

फायर टॉरनॅडो जंगलामध्ये लागलेली आग ३० हजार फुटांपर्यंत हवेत नेऊ शकतं, असं जॉनसन यांनी सांगितलं. असं वादळ येतं तेव्हा वाऱ्याचा वेग ११० मैल प्रती तास इतका असतो. हा वेग १३५ मैल प्रती तासापर्यंत वाढू शकतो. यापूर्वी २०१८ साली कॅलिफोर्नियामध्ये फायर टॉरनॅडो दिसलं होतं. त्यावेळी वारा १६५ मैल प्रती तासाच्या वेगाने वाहत होता, अशी आठवणही जॉनसन यांनी सांगितली. आतापर्यंत या आगीमुळे २० हजार एकर जंगल नष्ट झालं आहे. फायर टॉरनॅडोमुळे अधिक प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.