इंटरनेट ऑफ थिंग्स, आर्टीफिशल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) यासारख्या गोष्टींबद्दल आपण अनेकदा ऐकतो, पाहतो आणि वेगवेगळ्या माध्यमांमधून माहिती घेत असतो. अगदी अनेक चित्रपटामध्येही आपण इंटरनेटचा किंवा या कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करुन रोबोट्सने मानवावर हल्ला केला तर काय होईल यासंदर्भातील कल्पनाविस्तार अगदी रंजक पद्धतीने मांडलेला पाहतो. मात्र आता हळूहळू खरोखरच इंटरनेटचा आणि रोबोट्सचा वापर वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे. केवळ यंत्रमानवच नाही तर रोबोटीक अॅनिमल म्हणजेच प्राण्यांच्या रुपातील रोबोट ही संकल्पनाही हळूहळू प्रत्यक्षात येताना दिसत आहे. बोस्टन डायनॅमिक्स या अमेरिकन कंपनीने अशाच प्रकारचा एक रोबो डॉग बनवला आहे. या रोबो डॉगचा एक व्हिडिओ सध्या युट्यूबवर चर्चेचा विषय ठरत आहे.
युट्यूबवरील रोकोज – रोबोट ऑप्रेशन प्लॅटफॉर्म (Rocos – Robot Operations Platform) या चॅनेलवरुन बोस्टन डायनॅमिक्सची निर्मिती असणाऱ्या स्पॉट नावाच्या रोबो डॉगचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये पिवळ्या रंगाचा हा कुत्र्याप्रमाणे दिसणारा चार पायावर चालणारा रोबोत चक्क मेढ्यांची राखण करताना दिसत आहे.

“शेती व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये अशाप्रकारच्या स्वायंचलित रोबोटचा वापर केल्याने अन्न उत्पादन क्षमता वाढत आहे. किमान नुकसान होईल अशा पद्धतीने उत्पन्नाच्या अंदाजामधील अचूकता वाढवणे, कामगारांच्या कमतरतेचा ताण दूर करणे आणि शेती संदर्भातील कामांचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करणे यासाठी बोस्टन डायनेमिक्सचे निर्माण केलेले स्पॉट सारखे रोबोट्स कामी येतात,” अशी कॅप्शन या व्हिडिओ देण्यात आली आहे.