तुम्ही इंटरनेटवर हुला हूप या खेळाचे अनेक मजेदार व्हिडिओ नक्कीच पाहिले असतील. रब्बर किंवा प्लॅस्टीकची बांगडीसारखी मोठी रिंग कमरेमध्ये गोलगोल फिरत बॅलेन्स करण्याचा हा खेळ कोणत्या नवख्या व्यक्तीचं काम नाही. शरीरामध्ये लवचिकता आणि ती रिंग बॅलेन्स करण्यासाठी सुसूत्रता खूप महत्वाची असते. त्यामुळेच अनेकांना काही सेकंदही ही रिंग बॅलेन्स करता येत नाही. मात्र हा हुला हूपचा खेळ एका तरुणीने चक्क साडी नेसून केल्याचे सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र खरोखरच असा पराक्रम एका तरुणीने केला असून दिल्ली सिक्समधील गेंदा फूल गाण्यावर तिने साडी नेसून डान्स करतानाच हुला हूपची रिंग बॅलेन्स करण्याचा आगळावेगळा प्रयोग केला असून हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील तरुणी गेंदा फूल गाण्यावर हुला हूप बॅलेन्स करताना दिसत आहे. केवळ कंबरेतच नाही तर हातावर, मानेत, पायावरही ही तरुणी नाचता नाचता ही रिंग बॅलेन्स करते अगदी सहज. या परफॉर्मन्सदरम्यान ही मुलगी ब्रेक डान्सच्याही काही स्टेप्स करताना दिसते. रचना कनवर यांनी हा व्हिडिओ ट्विट केला असून बारा तासांमध्ये तो चार हजारहून अधिक जाणांनी शेअर केला आहे. “जेव्हा साडी आणि स्पोर्ट शूट गेंदा फूल गाण्याच्या निमित्ताने एकत्र येतात तेव्हा असं काहीतरी घडलं. शुक्रवार सुरु करण्यासाठी अगदी उत्तम व्हिडिओ,” अशा कॅप्शनसहीत हा व्हिडिओ रचना यांनी शेअर केला आहे.

रचना यांच्या या ट्विटवर अपर्णा जैन यांनी या व्हिडिओमधील मुलगी ही द हिंदूच्या पत्रकार चित्र नारायणन यांची मुलगी असल्याचे सांगितले. “या मुलीचे नाव इशना असून ती चित्रा नारायणन यांची मुलगी आहे. ती हुला हूपची मास्टर आहे. मागील काही वर्षांपासून ती अशाप्रकारे साडी आणि शूज घालून सराव करते. तुम्ही तिच्या विद्यार्थ्यांनी साडी नेसून केलेल्या हूपचे व्हिडिओ पाहा. भन्नाट आहेत,” असं अपर्णा यांनी म्हटलं आहे.

व्हिडिओत दिसणाऱ्या इशानाची आई म्हणजेच चित्रा यांनीही ट्विटवरुन या व्हिडिओसंदर्भातील ट्विट केलं आहे. “सकाळी उठले तेव्हा अनेकांनी मला व्हॉट्सअपवर हा व्हिडिओ पाठवल्याचे लक्षात आले. ही आहे माझी मुलगी जिने ट्विटवरुन साडी फ्लो हा ट्रेण्ड सुरु केला आहे,” असं म्हणत चित्रा यांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.

महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वोसर्वा आनंद महिंद्रा यांनाही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. “मला वाटतं हा व्हिडिओ पाहण्यास मी खूपच उशीर केला आहे. मात्र त्यामुळे मला आश्चर्याचा धक्का लागला नाही असं नाहीय. शुक्रवारची इतकी भन्नाट सुरुवात करुन देणाऱ्या या व्हिडिओसाठी धन्यवाद. हा साडी फ्लोवाला ट्रेण्ड असाच वाढत राहो,” असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे.

इशनाचा हा व्हिडिओ साडेतीन लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.