बालीच्या हॉटेलमधून एका भारतीय कुटुंबाने अनेक वस्तू चोरल्या आणि त्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. या सर्व घटनेचा २ मिनिटे २० सेकंदांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हॉटेलमधून बाहेर निघण्याच्या तयारीत असणाऱ्या या भारतीय कुटुंबाच्या बँगांमधून हॉटेलमधील वस्तू बाहेर काढताना एक कर्मचारी दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी या भारतीयांनी अक्षरश: देशाची लाज काढल्याची भावना व्यक्त केली आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये चित्रित केल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत हॉटेलमधील एक कर्मचारी भारतीय कुटुंबाच्या गाडीमधील बॅगा उघडून तपासून पाहताना दिसत आहे. हा कर्मचारी बॅग तपासताना व्हिडिओमधील महिला त्याच्याशी वाद घातलाना दिसत आहे. या कुटुंबाने हॉटेलच्या रुममधील बरेचसे सामान चोरुन नेण्याच्या उद्देशाने बॅगेतील कपड्यांमध्ये गुंडाळल्याचे कर्मचाऱ्याने उघडकीस आणल्याचे व्हिडिओत दिसते. या सामानामध्ये बाथरुममधील बरेचसे सामान, इलेट्रीक वस्तू, टॉवेल्स, कपड्यांचे हँगर्स अशा हॉटेलच्या मालकीच्या बऱ्याच वस्तूंचा समावेश असल्याचे व्हिडिओत दिसते. या व्हिडिओतील सुरक्षारक्षक ‘तुम्ही आमच्या हॉटेलमधील शक्य तेवढ्या सर्व गोष्टी चोरुन घेऊन जात आहात अगदी कपड्यांचे हँगरही तुम्ही चोरायचे सोडले नाही’ असं म्हणता ऐकू येतो.

रंगेहाथ पकडले गेल्यानंतर या व्हिडिओमधील महिला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडे, ‘आमच्या विमानाची वेळ झाली आहे. आम्ही या सर्व चोरलेल्या सामानाचे पैसे भरतो आम्हाला जाऊ द्या’ अशी विनंती करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक पुरुषही हवं तर या सर्व सामानाचे पैसे घ्या असं हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना सांगताना ऐकू येत आहे. मात्र हॉटेल कर्मचाऱ्यांनी पैश्यांची ही ऑफर धुडकावल्याचेही व्हिडिओत दिसत आहे.

हा व्हिडिओ सर्वात आधी ट्विटवर हेमंत नावाच्या व्यक्तीने पोस्ट केला. ‘हे कुटुंब हॉटेलमधील सामान चोरताना पकडले गेले. भारतासाठी लाज आणणारी गोष्ट आहे. आपल्यापैकी ज्यांच्या ज्यांच्याकडे भारतीय पारपोर्ट आहे त्यांनी आपण देशाचे प्रतिनिधित्व करतो हे लक्षात घेऊनच वर्तवणूक करायला हवी. आपली विश्वासर्हता पणाला लावणाऱ्या लोकांचे पासपोर्ट सरकारने रद्द करायला हवेत’ असं मत हेमंत यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना व्यक्त केले आहे.

इंडोनेशियामधील बाली येथील ही घटना असल्याचे हेमंत यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. इंडोनेशियातील लोकं भारतातील लोकांबरोबर खूप चांगल्या पद्धतीने वागतात मात्र या प्रकरणानंतर यावर परिणाम होईल अशी भिती हेमंत यांनी व्यक्त केली आहे.

हा सर्व प्रकार भयंकर आणि अपमानजनक असल्याचे अनेकांनी या ट्विटवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

आधी चोरी आणि मग पैश्यांची ऑफर

अशा लोकांमुळेच भारतीयांना त्रास होतो

भारतीयांना नकार मिळू लागला तर

…म्हणून रेल्वेत

या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे

आपल्या देशाची काय प्रतिमा तयार होत असेल विदेशात

दरम्यान, अनेकांनी या कुटुंबाचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी ट्विटवरुन केली आहे. तरी हे कुटुंब कोण आहे याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. मात्र खरोखरच अशाप्रकारच्या वर्तवणुकीमुळे भारतीयांची मान शर्मेने खाली जाते असं नेटकऱ्यांच म्हणणं आहे.