उत्तर प्रदेश पोलीस हे त्यांच्या वेगवेगळ्या कारनाम्यांसाठी कायमच चर्चेत असतात. मात्र यावेळेस एक अगदीच विचित्र प्रकार समोर आला आहे. बहराइच येथील पोलीस अधिकाऱ्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी दुचाकीस्वारांकडून चलान वसूल करण्यासाठी हेल्मेट घातलेल्या व्यक्तीला बाईकवरुन उतरवून त्याच्या पाठीमागे बसलेल्यांला गाडीवर बसायला सांगत पुरावा म्हणून फोटो काढताना दिसतोय. यासंदर्भातील व्हिडीओ बहराइचमध्ये व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली आहे. चुकीच्या पद्धतीने चलान कापणाऱ्या या अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत.

बहराइच जिल्ह्यातील रिसिया पोलीस स्थानकाच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला आहे. येथे तैनात असणाऱ्या जितेंद्र कुमार वर्मा यांनी एका दुचाकीस्वाराला थांबवलं आणि त्याचं चलान कापलं. दिवसाढवळ्या पोलीसच चुकीच्या पद्धतीने लोकांना दंड करुन त्यांच्याकडून पैसे घेत असल्याचं चित्र दिसत आहे. अशापद्धतीने दुचाकीस्वाराची काहीही चूक नसतानाच चुकीच्या मार्गाने चलान कापणाऱ्या अधिकाऱ्याचा व्हिडीओ रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या इमारतीमधून कोणीतरी शूट केला आणि सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केला. पाहता पाहता हा व्हिडीओ व्हायरल झाला.

व्हायरल व्हिडीओमध्ये हेल्मेट घालून चाललेल्या एका दुचाकीस्वाराला पोलीस अधिकारी थांबवतो. त्यानंतर तो त्यांच्याशी चर्चा करतो. या बाईकस्वाराच्या मागे बसलेला व्यक्ती गाडीवरुन खाली उतरुन पोलिसांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतो. मात्र पोलीस अधिकारी हेल्मेट घातलेल्या व्यक्तीला गाडीवरुन उतरायला सांगून या हेल्मेट न घातलेल्या व्यक्तीला गाडीवर बसायला सांगतात आणि आपल्या मोबाइलमध्ये हेल्मेट न घातला गाडी चालवणारी व्यक्ती म्हणून या व्यक्तीचा फोटो काढून चलान कापतात. या अधिकाऱ्याने या दोघांकडून अडीच हजार रुपये दंड म्हणून वसूल केल्याचं वृत्त हिंदुस्तान लाइव्ह या हिंदी वृत्तपत्राने दिलं आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या अधिकाऱ्याविरोधात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत.